पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे, सोने-चांदी यासारख्या वस्तूंचा गैरवापर टाळण्यासाठी आयकर विभागातर्फे स्वतंत्र देखरेख कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तसेच, यादरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यात 50 क्विक रिस्पॉन्स’ टीम स्थापन करण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आयकर विभागाला देण्यात आलेल्या सूचनेनुसार विभागातर्फे हे स्वतंत्र देखरेख कक्ष स्थापण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयकर विभागाचे मुख्य संचालक संदीप कपूर यांनी ही माहिती दिली.
नोडल अधिकार्यांच्या नियुक्त्या
संदीप कपूर म्हणाले, निवडणूक काळासाठी विभागातर्फे आठवड्याचे सर्व दिवशी चोवीस तास खुले राहतील असे देखरेख कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यात 50 किव्क रिस्पॉन्स टीमही स्थापन केल्या आहेत. या टीमच्या सहाय्याने काळ्या पैशांचा वापर आणि गैर व्यवहार रोखण्याचा प्रयत्न विभागातर्फे केला जाणार आहे.
आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक अजय मोदी यांची राज्याच्या नोडल ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुणे विभागाच्या अखत्यारित पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे असे पाच विभागीय कार्यालये स्थापन करण्यात आली असून या पाचही कार्यालयांसाठी पाच विभागीय नोडल अधिकारी नेमले आहेत. हे अधिकारी दररोज निवडणूक आयुक्तांना आपला अहवाल पाठवतील. या कारवाईअंतर्गत दोषी आढळणार्या व्यक्तीस आयकर कायदा 1961 अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल. आपल्या आसपास काही गैरव्यवहार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्वरित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कपूर यांनी केले आहे.
टोल फ्री क्रमांक
18002330700
18002301701
व्हॉट्स ऍप क्रमांक
7498977898