लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या हालचाली

0

नवी दिल्ली : मोदी सरकारचा कार्यकाल 2019 मध्ये पूर्ण होत असून केंद्र सरकार त्याआधीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या तयारीला लागले असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच वेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकाही घेतल्या जाऊ शकतात. निवडणूक आयोगाला वाटल्यास सोयीनुसार आयोग मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा भाषणांमधून जाहीर केलेले आहे की पाठोपाठ होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे सरकारच्या कारभारावर विपरित परीणाम होतो आणि आर्थिक भारही पडतो. नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये मोदी लोकसभा निवडणुका चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांबरोबरच घेतील, असा राजकीयधुरीणांचा होरा आहे.

मुखर्जींचेही हेच मत….
माजी राष्ट्रपती या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन भाषणात निवडणूक सुधारणांवर भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांबरोबर विचारविनिमय करावा. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाच वेळी होतील किंवा कसे हे पहावे, असे प्रणब मुखर्जी यांनी सुचविले होते.

या राज्यात निवडणुका शक्य…
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसंभांचा कार्यकाल नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये समाप्त होत आहे. याशिवाय तेलंगाणा, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांच्या विधानसभांचा कालावधी एप्रिल 2019 पर्यंत आहे. तर युपीसह अन्य राज्यांमध्ये मात्र अशा प्रकारचा धोका पत्करला जाणार नसल्याचे वृत्त आहे.