पुणे/पिंपरी-चिंचवड : सद्या शिवसेनेच्या ताब्यात असलेले मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेत, भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक महेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात पक्षाचे ‘राम-लक्ष्मण’ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांना उतरविले जाणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, नगरसेवक यांना आतापासून कामाला लागण्याची सूचनाही पक्षनिरीक्षकांनी दिली आहे. मावळमधून शिवसेना उमेदवाराच्याविरोधात आ. जगताप हे मैदानात उतरणार असून, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे शिवसेनेच्याच सूत्राने सांगितले. तर शिरुरमधून खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात आ. लांडगे उतरविले जाणार असून, ही लढत अत्यंत चुरशीची होईल, अशी माहितीही पक्षसूत्राने दिली.
मावळ, शिरुरसाठी भाजपकडून केंद्रीय निरीक्षक!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आतापासूनच मिशन-2019च्या मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यानुसार, उत्तरप्रदेशात मंत्री असलेल्या महेंद्र सिंग यांच्याकडे मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सिंग हे पक्षनिरीक्षक म्हणून या मतदारसंघात लक्ष घालत आहेत. त्यांनी लांडगे व जगताप या दोन्ही गटाची मागील रविवारी गोपनीय बैठकही घेतली. या बैठकीला भोसरी, तळेगाव, मावळ, शिरुर, खेड या भागातील पक्षाच्या ठळक कार्यकर्ते व नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यकर्त्यांची मतेही सिंग यांनी जाणून घेतली. या बैठकीत आ. महेश लांडगे यांच्या गटाला सिंग यांनी पुरेशी सकारात्मक प्रतिक्रिया न दिल्याने हा गट नाराज झाला होता. परंतु, आ. लांडगे यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू ठेवावी, असा निरोप नंतर देण्यात आल्यानंतर हा गटही कामाला लागला आहे. भाजपचे 350+ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय नेते देशाच्या विविध भागात नियोजन करत आहेत. त्यानुसार, महेंद्र सिंग यांनी तातडीने पुणे गाठून या दोन मतदारसंघासह शहरातील भाजपच्या मतदारसंघाचाही आढावा घेतला. पुण्यातून खा. अनिल शिरोळे यांच्याऐवजी यावेळेस पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाचा विचार व्हावा, असा आग्रहही पुण्यातील एका गटाने धरल्याचे सूत्राने सांगितले.
शिवसेनेचे खासदार भाजपच्या संपर्कात?
महाराष्ट्रातील लोकसभेच्या सहा जागांची जबाबदारी अमित शहा यांनी महेंद्र सिंग यांच्यावर सोपावलेली असून, त्यात पुणे शहर व जिल्ह्यातील जागांचाही समावेश आहे. यातील बहुतांश जागा या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. या जागांसाठी भाजपकडून जोरदार रणनीती आखली जात असल्याने पुढील लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोन्हीही खासदार भाजपच्या संपर्कात असून, ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याची माहितीही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सिंग यांना दिल्याचेही खात्रीशीर सूत्राने सांगितले. तथापि, पिंपरी-चिंचवडमधील राम-लक्ष्मण यांचा या दोघांना भाजपात घेण्यास कडाडून विरोध आहे. आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे यांना खासदारकीसाठी लढावयाचे निश्चित असून, खा. बारणे व खा. आढळराव भाजपात आले तर या दोघांचे स्वप्न भंग होईल, अशी माहितीही केंद्रीय निरीक्षक सिंग यांना देण्यात आली.
खा. आढळरावांती पकड ढिली करणार…
आपल्या छोटेखानी पुणे दौर्यात केंद्रीय निरीक्षक महेंद्र सिंग यांनी भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे, आ. बाबूराव पाचारणे आणि योगेश टिळेकर यांच्याशीही चर्चा केली. या तिघांनाही पक्ष कार्यात सक्रीय होण्यासह कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे, शिरुर मतदारसंघात लक्ष घालणे व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे, आदी निर्देश दिले आहेत. या तीन आमदारांसह पक्षाचे अन्य नेतेही शिरुर लोकसभा मतदारसंघात लक्ष घालणार आहेत. या मतदारसंघात खा. शिवाजीराव आढळराव यांची मजबूत पकड असून, ही पकड ढिली करण्यासाठी जोरदार प्रयत्न भाजपकडून केले जाणार आहेत. आ. लांडगे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असले तरी, अद्याप पक्षाने त्यांना तसा ग्रीन सिग्नल दिलेला नाही, तरीही त्यासाठी पक्ष अनुकूल असल्याचेही भाजप सूत्र म्हणाले. तर मावळसाठी आ. लक्ष्मण जगताप यांनी तयारी करावी, असे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अलिकडेच आ. जगताप यांनी खा. बारणे यांच्यावर टीकास्त्र डागत वातावरण तापविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.