मावळ काबीज करण्यासाठी कामाला लागा; शरद पवार यांचा आदेश
पार्थ पवारसाठी शरद पवार नाहीत अनुकूल
पिंपरी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय आढावा बैठका आज (मुंबईत) सुरु आहेत. मावळातून निवडणूक लढविण्यासाठी आपण सज्ज असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बैठकीत सांगितले. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मावळातून लढण्यास शरद पवार अनुकूल नाहीत. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणार्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न पवार यांनी बैठकीत उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार मुंबईत लोकसभा मतदार संघानिहाय पदाधिका-यांच्या आढावा बैठका घेत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे याची माहिती घेतली.
हे देखील वाचा
शहराध्यक्ष वाघेरे इच्छुक
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती पवार यांना दिली. पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या. आतापासून सार्यांनी कामाला लागले पाहिजे. नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. फक्त निवडणूक समोर ठेवून नाही तर एक व्यक्ती म्हणून चांगले काम केले पाहिजे. समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राजकारण करताना स्वार्थ नाही तर निःस्वार्थी होऊन केले पाहिजे. तसे समाजकारण केले तर नक्कीच यश मिळेल आणि पक्षाला फळ मिळेल.
कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ परिसरातून राजकारणात एंट्री करणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढविली. तर, पक्ष बांधणी करणार्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा प्रश्न पवार यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर मोठे पवार अनुकूल नसल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षासाठी काम करणार्या तळागाळातील कार्यकर्ते आपल्या विश्वासावर येथे काम करतात. मग या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी संधी दिली पाहिजे.