पिंपरी चिंचवड, बापु जगदाळे- पुणे जिल्हयात राज्यातील 48 मतदारसंघापैकी बारामती, पुणे, मावळ व शिरुर असे चार मतदारसंघ येतात. या चार मतदारसंघापैकी बारामती राष्ट्रवादीकडे, पुणे भाजपाकडे तर मावळ व शिरुर शिवसेनेकडे आहेत. सर्वच पक्ष आपआपल्या जागा राखण्याबरोबरच इतरही जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवर देखील आता आपला हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. तर युती नाही झाल्यास भाजप देखील येथील सर्वच जागा लढणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी कमालीची रंगत येणार की नाही हे आताच सांगता येत नाही. पण शिरुर मधून भोसरीचे आमदार महेश लांडगे शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात उभे राहिल्यास मात्र शिरुरचा लोकसभेचा सामना अत्यंत चुरशीचा होणार यात शंका नाही. पण सध्यातरी आमदार लांडगे यांनी सावध पवित्रा घेतला असून या बाबत तरी ते शांतच असल्याचे दिसत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीला आठचते नऊ महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. त्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिलेल्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली असून उमेदवार निश्चित केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेऊन खासदार शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारीसाठी ‘ग्रीन’ सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आढळराव आणि बारणे यांच्यासमोर राष्ट्रवादी आणि भाजपकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
शिरुर मतदार संघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव खासदार असून त्यांची ही तिसरी टर्म आहे. आता चौथी निवडणूक लढविण्यास ते सज्ज झाले आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन खेडचे खासदार अशोक मोहळ, माजी आमदार विलास लांडे, आंबेगावचे देवदत्त निकम यांचा पराभव केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये भोसरी, खेड, शिरुर, जुन्नर, हडपसर, आंबेगाव या विधानसभा मतदार संघांचा समोवश आहे. यापैकी केवळ खेड विधानसभेत शिवसेनेचा आमदार आहे.तर जुन्नर मध्ये मनसेचे एकमेव शरद सोनवणे, आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, तर उर्वरीत दोन ठाकणी व एक सहयोगीसद्सय असे भाजपाचे तीन आमदार आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
लोकसभेसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या नावाची जोरदार चर्चा मागील विधानसभेच्या विजयनंतरच काही महिण्यातच करायला सुरवात केली होती. त्यामाघील त्यांचा हेतु काय होता, तो वेगळा विषय असलातरी आता भाजपाला त्यांच्या सारखा सक्षम व तुल्यबळ उमेदवारशिवाय पर्याय नाही.. त्यामुळे युती नाही झाली. तर भाजपचे उमेदवार महेश लांडगे हेच असण्याची दाट शक्यता आहे. तर, राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे यंदाही लोकसभा नलढविण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या ऐवजी हडपसरमधील व पुणेमहानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश मगर,खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात. शिरुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने आढळराव यांच्यासाठी निवडणूक कठिण जाण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी भोसरीचे आमदार महेश लांडगे शिरुरच्या आखाड्यात उतरल्यास आढळराव यांच्या गढाला ते सुरुंग लावू शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादीची देखील लांडगेना होऊ शकते मदत
तसेच त्याला कारणही तसेच आहे. कारण राष्ट्रवादीचा एक गट आपल्या विधानसभेच्या फायद्यासाठी लांडगे यांना लोकसभेला छुपी मदत नक्की करु शकतो, त्या बरोबरच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील खेड व जुन्नरमधून देखील लांडगे यांना सर्वपक्षीय मदत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भोसरी व हडपसर या मतदारसंघातून देखील भाजपाला चांगले मतदान होण्याचा आंदाज वर्तवीला जात आहे. महापालिका कार्यक्षेत्र असलेल्या भोसरी व हडपसर मतदारसंघात खासदार यांचे कोणत्याही प्रकारचे विकासाचे योगदान नसल्यामुळे लांडगे यांना या ठिकाणाहून चांगला जनाधार मिळेल अशी अपेक्षा लांडगे समर्थक व्यक्त करत आहेत. तसेच राष्ट्रवादीमध्ये देखील खासदार आढळराव यांना पुर्ण ताकदीने रोखण्याचे बळ नाही. यामुळे वळसे पाटील ऐवजी पुन्हा एकदा नवीन चेहरा ते यावेळी देखील लोकसभेला उभा करु शकतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे लांडगे यांनाच त्यांचे बळ मिळण्याची शकयता असून काटयानेच काटा काढण्याचे धोरण त्यांच्याकडून अवलंबले जाऊ शकते.
पण मतदारसंघात आढळारावांची ताकद मोठीच
आढळरावांनी या लोकसभा मतदारसंघात तीन्हीवेळेस चढत्या मताधिक्याने हे मैदान मारले आहे.दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांनी त्याच्यापासून पळ काढलेला आहे. यावरुनच या मतदारसंघाच खासदारांचे स्थान व स्थिती किती आढळ आहे याची कल्पना येऊन जाते. त्यामुळे त्यांची असलेली ताकद दांडगा लोकजनसंपर्क दुर्लक्षीत करुन चालणार नाही.
पक्षीय बलालः
शिवसेना 1, राष्ट्रवादी 1 मनसे 1, भाजपा 2, अपक्ष 1