बाणेर :- शेतकऱ्यांना शेतीमधील फायद्याचे अनेक गोष्टींचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याची गरज तळागाळातील लोकांची आहे. त्यामुळे लोकसहभागातून नक्कीच क्रांती घडेल, असे मत भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक-अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, केवळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काय केले पाहिजे, यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला जे जमते त्यावर काम करावे. विषमुक्त शेती आणि कॅन्सरमुक्त भारत बनविण्यासाठी सगळे मिळून काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
बाणेर रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे बीव्हीजी फाऊंडेशन व महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनतर्फे शेतकरी कुटुंब, ग्रामीण युवक व महिलांसाठी शेतकरी सक्षमता अभियान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शेखर मुंदडा, विजय आठवले, बीव्हीजी ग्रुपचे दीप शुक्ला, भालचंद्र पोळ, गणेश लिमये, प्रदीप तुपे, मुकुंद शिंदे, वैभव मोगरेकर, ज्योत्स्ना वरुडकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सध्या 650 छोट्या- मोठ्या एनजीओ फेडरेशनशी जोडल्या गेल्या आहेत. भारतातील लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या 70 टक्के शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावी, तसेच शेतीविषयी असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. असेही त्यांनी सांगितले. विजय वरुडकर यांनी सूत्रसंचालन केले.