मुळशी । लोकसहभागामुळे नांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूप पालटले आहे. शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. त्यातून शाळेची सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त अशी इमारत उभारण्यात आली आहे. या शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
या शाळेस मुळशी तालुक्यातील एक आदर्श शाळा असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी शाळेस नुकतीच 1 लाख रुपयांची देणगी दिली आहे. ग्रामस्थ सुरेश रानवडे यांनी 25 हजार, हनुमंत करंजावणे यांनी 5 हजार रुपयांची देणगी दिली आहे. तसेच अन्य दानशूर व्यक्तींनी शाळेस देणगी दिली आहे. सरपंच प्रशांत रानवडे यांच्या हस्ते ही मदत शाळेकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल रानवडे, बाळासाहेब रानवडे, वसंत भालेकर, अश्विनी रानवडे, कविता माकर, तंटामुक्ती अध्यक्ष अजय करंजावणे, उपाध्यक्ष संतोष ढमाले, विजय डांगे, मारुती मारणे, अशोक शिंदे, संभाजी रानवडे, माणिक रानवडे, शेखर रानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.