बारामती । बारामतीत प्लास्टिक कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसहभागातून शहराला प्लास्टिकमुक्त करा, असे आदेश बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, थर्माकॉलच्या डिश, ग्लास अशा प्रकारचा प्लास्टिक कचरा जागोजागी दिसून येत आहे. कचर्याचा प्रश्न उग्र झाला असून प्लास्टिकच्या कचर्यामुळे ही समस्या जटील बनली आहे. प्लास्टिकमुळे कचर्याचे निर्मूलन करण्यास तसेच जमिनीमध्ये जिरविण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कारवाईचा अहवाल कार्यालयास सादर करा, असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकार्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. प्लास्टिकचा वापर नियमाप्रमाणे केल्यास शहर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्लास्टिकमुक्त बारामती करण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. प्रशासन कायमस्वरूपी प्लास्टिकवर बंदी घालणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले.