लोकसहभागातून विकसीत करणार उद्याने

0

बारामती । बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी प्रभाग क्रमांक 2 मध्ये दोन उद्याने विकसित करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. यानुसार नगरपरिषदेने या कामांना मंजुरीही दिली होती. मात्र या कामास सरकारकडून निधी मिळत नसल्याने ही दोन उद्याने रखडली होती. निधी उपलब्ध होत नसल्याने अन्य विकास कामांना गती मिळत नाही म्हणून लोकांच्या सहभागातून पर्यायाने उद्योजकांच्या सहभागातून ही उद्याने विकसीत करण्यात येणार आहेत, असे उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.

भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून बारामती नगरपरिषदेला निधी मिळविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ नये यासाठी पाटील यांनी काही उद्योजकांच्या मदतीने लोकवर्गणीतून माऊलीनगरमध्ये उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्यानाचा खर्च 16 लाख रुपये अपेक्षित असून शुक्रवारपासून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. या कामाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जेष्ठ विधिज्ञ रमेश कोकरे, नगरसेविका निता माळी, शेखर हुलगे, आनंद फडणवीस, नामदेव भोसले, अरविंद खैरे, मोहन धुमाळ, प्रशांत जगताप, अशोक उडपी, चंद्रकांत जगताप, केशर जाधव, मंगल लोखंडे यांच्यासह विविध मान्यवर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.