फैजपूर- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे 2018-19 या वर्षाची महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता श्रेणी जाहीर केली. त्यात फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाने ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. याविषयी माहिती देतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ व्ही.आर.पाटील म्हणाले की, आज भारतीय शिक्षणासाठी केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून तांत्रिक कौशल्य सह समाजाभिमुख संशोधन ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने आमचे महाविद्यालय कार्य करीत आहे. आमचे महाविद्यालय ग्रामीण परीसरातील पहिले आयएसओ 9000 मानांकन प्राप्त केलेले महाविद्यालय आहे. तसेच महाविद्यालय एनबीए मानांकित असून पुनर्मनाकनासाठी अर्ज केलेला आहे. येथे विद्यार्थ्यांना अद्ययावत शैक्षणिक व संशोधन सुविधा पुरविल्या जातात. विद्यार्थ्यांचा सामाजिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. यात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व करियर च्या विविध उपक्रम राबविले जातात. या सन्मानामुळे संस्थाध्यक्ष माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, चेअरमन लिलाधर चौधरी व सर्व संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला.