लोकांच्या गरजा ओळखून कामाची दिशा ठरवा

0

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरेपाटील यांचे पोलिसांना आवाहन

राजगुरुनगर । प्रत्येक नागरिकाने साध्या वेशातील पोलिसाची भूमिका निभावणे गरजेचे आहे. पोलिसांनी लोकाभिमुख पोलिसिंग करावे. पोलिस हा जनतेचा सेवक असून त्याने लोकांच्या गरजा कोणत्या पद्धतीच्या आहेत त्याचा अभ्यास करून कामाची दिशा ठरवायला हवी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरेपाटील यांनी केले. खेड पोलिस उपविभाग कार्यक्षेत्रांतील निवडक नागरिकांशी त्यांनी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलिस अधिक्षिका तेजेस्विनी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, मनोज यादव, प्रकाश धस, सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, दत्ता दराडे, नंदकुमार गायकवाड, प्रदीप पवार, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्यासह अनेक पोलिस पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

गावागावात कॅमेरे बसविण्याची गरज
चाकण पोलिस ठाण्यात मनुष्यबळ वाढविले जाईल, असे सांगून वाढत्या नागरीकरणामुळे पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे नांगरेपाटील यांनी सांगितले. नागरिकांचा पोलिस स्टेशनशी संपर्क वाढायला हवा, असे ते म्हणाले. ग्रामस्थांना गुन्हेगारी रोखण्यासाठी आवाहन करताना गावागावात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्याची गरज व्यक्त केली. बालवयातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करून पालकांनी आपल्या मुलांना गुन्हेगारीपासून रोखायला हवे. त्यासाठी त्यांची संगत तपासा. ते इंटरनेटचा वापर कसा करतात ते पाहा असे ते म्हणाले.

पोलिस पाटलांना बंदुकीचा परवाना
पुणे जिल्ह्यात सुमारे 1600 पोलिस पाटील असून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता जनता आणि पोलिस यांच्यातील दुवा म्हणून नि:पक्षपातीपणे काम करायला हवे. गावागावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यायला हवी. पोलिस पाटलांना ग्रामसुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना दिला जाईल, असे नांगरेपाटील यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींच्या पळून जाण्याबद्दल अपहरणाचा गुन्हा दाखल होत असल्याने पोलिस गांभीर्याने ही प्रकरण हाताळतात, असे सांगून ऑपरेशन मुस्कानमुळे सुमारे 3 हजाराच्यावर हरवलेली मुले परत घरपोच केल्याचे त्यांनी सांगितले. निर्भया पथकाच्या माध्यमातून टुकार, छेडछाड करणार्‍यां 538 टवाळखोरांवर कठोर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन
कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत येणार्‍या 5 जिल्ह्यातील 146 पोलीस ठाण्यांतर्गत महाराष्ट्र पोलिस युथ पार्लमेंटच्या माध्यमातून सुमारे 42,000 विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयावर समुपदेशन केल्याचेही नांगरेपाटील म्हणाले. महाविद्यालयातील तरुणांचा पोलिस मित्र, ग्राम सुरक्षा दल, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचे नियंत्रण आदींमध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना प्रातिनिधिक स्वरुपात हुतात्मा राजगुरू महाविद्यालयापासून पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले.

कर्मचारी वाढविण्यावर भर
सेवानिवृत्त जवान, पोलिस कर्मचारी, एन.सी.सी.कॅडेट, पोलिस पाटील यांच्या समन्वयातून सुरक्षेचे प्रयत्न केले जातील, असे सांगून बाहेरून येणार्‍या कामगारांची ओळख पटवावी तसेच अनोळखी, संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना कळवावी, असेही नांगरेपाटील यांनी सांगितले. चाकणमधील संघटीत गुन्हेगारीला बर्‍यापैकी चाप बसला असून चाकण व आळंदी या दोन पोलिस स्टेशनचे कर्मचारी वाढविण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी त्यांनी पोलिसांचे काम कशा पद्धतीने सुरू आहे व त्यात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, याबद्दल नागरिकांची मते समजावून घेऊन त्यांना समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी सातपुते यांनी केले.