जळगाव आणि सांगलीतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई:राज्यात आंदोलने होत आहेत. त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. आंदोलन सुरू असतानाही नागरिकांना आजही आमच्यावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मोदींनी विकासाचे जे राजकारण सुरू केले त्यावर जनतेचा आजही विश्वास आहे आणि या निकालावरून पुन्हा एकदा त्यावर मोहोर उमटल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आणि भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.
हे देखील वाचा
विजयानंतर मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, जळगाव आणि सांगली मिरजमध्ये नागरिकांनी भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून, मोदींनी जे विकासाचे राजकारण सुरू केले त्यावर जनतेने विश्वासाची मोहोर उमटवली आहे. आज राज्यात आंदोलने होत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या देखील रास्त आहेत. हे सरकार त्या मागण्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षण रोजगार, विकाससाचे प्रश्न सोडवण्यासाठी या विजयामुळे अजून पाठबळ मिळेल असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच सांगली मिरज कुपवाडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तरी जनतेने आम्हाला कौल दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांच्या मनात आजही भाजपाबद्दल विश्वास असल्याचे ते म्हणाले.
मुंबई भाजपा कार्यालयात जल्लोष
दरम्यान या विजयाचा जल्लोष मुंबईच्या भाजपा कार्यालयाबाहेर देखील करण्यात आल्याचे पहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला.