लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी काँग्रेसची संपर्क यात्रा

0

पुणे । लोकांशी थेट संपर्क साधण्याचे धोरण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने निश्‍चित केले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जानेवारी महिन्यात राज्यात संपर्क यात्रा काढणार आहेत.

पक्षाचा वर्धापनदिन गुरुवारी 28 डिसेंबर रोजी आहे. त्याच्या तयारीसाठी पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच झाली. त्यात आगामी धोरणेही ठरविण्यात आली. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत झाले. याचा उहापोह बैठकीत झाला. केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आंदोलने चालू केली ती यापुढे चालवावीत आणि त्याचबरोबर लोक संपर्क साधावा, असे ठरविण्यात आले. शेतकरी, कामगार, विविध जाती समूह यांच्यात जावे अशा सूचना प्रतिनिधींनी केल्या. यातून प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांचा संपर्क यात्रेचा कार्यक्रम ठरविला गेला. यात्रेचा समारोप पुण्यात करण्याचेही ठरले. तसेच शहर आणि गाव पातळीवर संपर्क मोहिमा आखण्याच्या सूचना देण्यात आल्या.यापूर्वी शेतकरी वर्गाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी संयुक्त यात्रा काढण्यात आली होती. त्यात अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुनील तटकरे असे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. आता मात्र काँग्रेसने स्वतंत्र यात्रा काढायचे ठरविले आहे. बदलत्या परिस्थितीत हे सूचक आहे. काँग्रेस पक्षात विश्‍वास निर्माण झाला, असे मानले जाते.