पाचोरा । पाचोरा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलिप वाघ यांचा आज 22 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधुन घेतलेल्या पत्रकार परिषदेत साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याचे सांगत कार्यकत्यांनी लोकाभिमुक अपक्रम व कार्यक्रम घेऊन जनहीत साधावा असे अवाहन केले. मा.आमदार दिलिप वाघ यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी दिलीप वाघ यांच्यासह पिटीसी चेअरमण संजय वाघ, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख नितिन तावडे, खलिल देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाण्या अभावी हाताबाहेर गेला आहे. दोन दिवसापासुन पाउस बर्यापैकी पडत असला तरी सुदैवाने हा पाऊस आठ ते दहा दिवसांपुर्वी पडला असता तर शेतकर्यासाठी लाभदायक ठरला असता अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्ताधार्यांच्या डोक्यात हवा
राजकारण करतांना राजकीय स्पर्धक किंवा विरोधक यांच्याशी सुड भावनेतुन वागणे आमची संस्कृती नाही. सत्तेची हवा आमच्या डोक्यात शिरू दिली नाही. सध्या सत्तेत असलेल्या सत्ताधार्यांच्या डोक्यात हवा घुसली आहे. त्यामुळे ते शेतकर्यांचा विचार करीत नाही. माझ्या वाढदिवसा निमित्ताने मी मतदार संघाच्या माझ्या शेतकरी, शेतमजुर, नोकरदार, व्यापारी व सर्व हितचिंतक बंधुंसाठी त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रार्थना करतो. मतदार संघातिल जनता सदैव माझ्या पाठिशी असल्याने मला त्यांची सेवा करण्याची
संधी मिळते.
गरजुंना मदत करा
वेळेवर पाउस झाला नसल्याने शेतिला व व्यवसायांना अवकळा आली आहे. शेतकरी जनता हवालदिल असतांना वाढदिवस साजरा करणे अशोभनीय आहे. कार्यकर्त्यांना वाढदिवी खर्च न करता ती रक्कम गरजु, शेतकर्यांना मदत करावी असे आवाहन केले आहे.
शेतकरी आत्महत्या दुर्दैवी
कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी बांधव आजही डोक्यावर कर्जाचे ओझे घेऊन चरीतार्थ चालवित आहे. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याने हा अतिशय दुर्दैवी व चिंतेचा विषय बनला आहे. कर्जबाजारी शेतकर्यांना शासनाच्या वतिने सरसकट कर्जमाफीसाठी संपावर जाण्याची वेळ देशाच्या शेतीप्रधान संस्कृतिला काळीमा लावणारी ठरली. केंद्र व राज्य शासनाकडे जगाच्या पोशिंद्याला सरसकट कर्जमाफीसाठी याचना करावी लागते ही बाब राज्यकर्त्यांना शोभनिय नसल्याने त्यांनी सांगितले.