ओव्हल-भारतीय संघाने पुन्हा एकदा कसोटी सामन्यावर ताबा मिळविण्याची संधी गमावली आहे. पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी ७ फलंदाज १९८ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडने ३३२ धावांचा डोंगर उभा केला. जोस बटलर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी नवव्या विकेटसाठी ९८ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, भारताच्या लोकेश राहुलनेही दुसऱ्या दिवशी एक वेगळा विक्रम नावावर केला.
बटलर व ब्रॉड यांची जोडी खोऱ्याने धावा करत असताना रवींद्र जडेजाने ब्रॉडला बाद केले. जडेजाच्या चेंडूवर ब्रॉडने मोठा फटका मारला, परंतु तो जास्त काळ हवेतच राहिला आणि लोकेश राहुलने अप्रतिम झेल टिपला. राहुलने हा झेल टिपताच त्याच्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला गेला. इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध मालिकेत सर्वाधिक १३ झेल टिपण्याचा क्षेत्ररक्षकाचा विक्रम राहुलने नावावर केला. या मालिकेत यष्टीरक्षक ऋषभ पंतने १३ झेल टिपले आहेत.
याशिवाय लोकेशने भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका मालिकेत सर्वाधिक १३ झेल टिपणाऱ्या भारतीय क्षेत्ररक्षकाचा विक्रम द्रविडच्या नावावर होता. द्रविडने मायदेशात २००४-०५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ४ सामन्यांत १३ झेल घेतले होते.