‘मी कसा घडलो’विषयावर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान
जळगाव: प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगळे काही करून नाव मोठे करण्याचे विचार असतात. मात्र लोक काय म्हणतील? या नकारात्मक विचारातून सकारात्मक विचार प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील? हा शब्द आयुष्यातून काढून टाका. हा शब्द लहानपणापासून मुलांच्या कानावर पडू देऊ नका असे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, अर्थतंत्र, साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी केले. जैन उद्योग समूहाचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त नोबेल फाऊंडेशन आणि भरारी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी जळगाव पीपल्सचे चेअरमन भालचंद्र पाटील, उद्योजक रजनीकांत कोठारी, सपन झुंझूनवाला, एस.जे.पाटील, सुभाष राऊत, नंदलाल गादिया, निरज अग्रवाल, डॉ.संजय शेखावत, भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, नोबेल फाऊंडेशनचे जयदीप पाटील आदी उपस्थित होते.
तीन पुस्तकांचे प्रकाशन
दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी लिखित ‘आऊट ऑफ बॉक्स’, दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील जयदीप पाटील संपादित ‘कलामांचे विचारधन’, डॉ.नरसिंग परदेशी लिखित ‘बिकानेर-महाराष्ट्र संबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.सूत्रसंचालन नोबेल फाऊंडेशनचे जयदीप पाटील यांनी केले. प्रस्तावना भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी यांनी केली.
डॉ.युवराज परदेशी लिखित ‘आऊट ऑफ बॉक्स’ पुस्तकाचे प्रकाशन
चाकोरी बाहेर विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जग बदलणाऱ्या असामान्य कर्तृत्वान व्यक्तींचे ‘अॉऊट ऑफ बॉक्स’ या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दैनिक जनशक्तीचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जगावेगळा विचार करणारे धाडसी व्यक्तीमत्वांच्या जीवन परिचयाची माहिती या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी या पुस्तकातून मिळेल यात शंका नाही.
कुतूहल बुद्धी जागृत ठेवा
देशाने विज्ञान क्षेत्रात मोठी वाटचाल केली आहे. मात्र विज्ञानात कुतूहलता महत्वाची आहे. प्रश्न पडले पाहिजे, प्रश्नातूनच संशोधनाला चालना मिळत असते. मात्र दुर्दैवाने आज आपण कुतूहल घालवून बसलो असल्याने विज्ञानिक बुद्धीला ब्रेक लागला आहे. कुतूहलतेत सगळे जग सामावले असल्याने कुतूहल बुद्धी जागृत ठेवा असे आवाहन अच्युत गोडबोले यांनी केले. मी स्वत:ला देखील अजून विद्यार्थी समजतो. दररोज काहीतरी नवीन करण्याचा विचार मी करत असतो. त्यासाठी कुतूहल बुद्धी जागृत ठेवावी लागते असेही त्यांनी सांगितले.
जे कराल ते उत्कृष्ट करा
प्रत्येक गोष्ट करताना त्यात सौंदर्य बघा, सौंदर्य बघितले तर ती गोष्ट चांगली होती. आयुष्यात जे काही करता ते उत्कृष्ट करा यश चालून येईल असे सांगून त्यांनी माझ्यावरही आयुष्यात मोठे दु:ख कोसळले मात्र त्यातून मार्ग काढत आजपर्यंतची वाटचाल करत आलो असल्याची प्रेरणादायी गोष्ट सांगितली. आयुष्यात व्यसनापासून दूर रहा असा सल्लाही श्री.गोडबोले यांनी उपस्थितांना दिला. स्वत:ला मोठे करायचे असेल तर आपल्याकडे काय आहे? यापेक्षा आपण कोण? आहोत हा प्रश्न स्वत:ला विचारा असेही त्यांनी सांगितले.