भुसावळ- सीआरएमएस ऑफिस, अमर स्टोअर्सजवळील रस्ता रेल्वे विभागातर्फे लोखंडी गर्डर टाकून अरुंद केला जात असल्याने हा प्रकार म्हणजे नागरीकांसह वाहनधारकांची गळचेपी असल्याचा सूर व्यक्त होत आहे. शहरात आधीच वाहतूक समस्येने वाहनधारकांसह शहरवासी हैराण असताना रेल्वेच्या या कृतीने अधिकच संताप व्यक्त होत आहे.
रेल्वेच्या मनमानीने संताप
भुसावळ बसस्थानक, रेल्वे स्थानक याच भागात असल्याने अहोरात्र या भागात नागरीक, प्रवासी व वाहन धारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने येथील जुन्या भिंती तोडून रस्ता काही प्रमाणात रुंद केला होता मात्र आज अचानक त्यांनी लोखंडी गर्डर रस्त्यावर टाकण्याचे काम सुरू करून पुन्हा रस्ता अरुंद करण्यास सुरुवात केली आहे. मुळात या रस्त्यावर सर्वात जास्त वापर रेल्वे कर्मचारी व रेल्वे प्रवाशांचा अधिक आहे तर रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. भुसावळ नगरपरीषद प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.