संभाजी नगरात सलग दुसर्या दिवशी चोरीची घटना उघड ; सोन्या चांदीच्या दागिण्यांसह 55 हजाराचा एैवज केला लंपास
जळगाव : शहरात एक दिवसाआड चोरी घरफोडीच्या घटना सुरु असून चोरटे जोमात व पोलीस प्रशासन कोमात असे सद्यस्थितीतील चित्र आहे. प्राध्यापकाच्या घरुन दीड लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना ताजी असताना दुसर्या दिवशी संभाजी नगरात विधी व न्याय विभाग मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव यांच्या घर फोडल्याची घटना समोर आली आहे. चक्क लोखंडी ग्रीलचे गेट तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व चॉकलेट आस्वाद घेत ठिकठिकाणी पान खाल्याच्या पिचकार्या मारत सोन्या चांदीच्या दागिण्यांसह रोकड असा 55 हजार एैवज लांबविला.
मुंबईहून परल्यावर प्रकार झाला उघड
शहरातील संभाजी नगरातील गट क्र.448/1 व प्लॉट क्र.48/ 1 मध्ये विधी व न्याय विभागातील सेवानिवृत्त सचिव अॅड. हरी दयाराम सपकाळे यांचा बहिणाई नावाचा बंगला आहे. येथे ते पत्नी मंगला, मुलगा अॅड. शामसुंदर, सून पारुल व नात स्वरा यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांचा लहान मुलगा शंतनू मुंबईतील मुलुंड येथे एम.एस.आर्थोचे शिक्षण घेत असल्याने संपूर्ण कुटुंब 3 जुलैपासून त्यांच्याकडे गेले होते. गुरुवारी रात्री 11 वाजता ते कारने जळगावातील घरी परतले असता मुख्य दरवाजाचे लोखंडीचे गेटचे कुलूप लावलेल होते. तर आतील सर्वच दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तुटलेले होते. विशेष म्हणजे कुलूप न तुटल्याने चोरट्यांनी थेट लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.
घरात सर्वत्र थुंकलेले, चॉकलेटवरही ताव
दोन्ही बेडरुमधील कपाट उघडे होते. लॉकरच्या चाव्या शेजारील कपाटातून काढून चोरट्यांनी अर्धा तोळे सोन्याचे कर्णफुले, दहा हजार रुपये रोख व 30 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, चमचे, वाट्या व ग्लास असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे अॅड.सपकाळे यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, घरात एका टोपलीत चॉकलेट आढळून आले. बेसीन तसेच भिंतीला लागून पान व गुटख्याचे थुंकलेले होते. घरात सर्वत्र अस्वच्छता होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अॅड.सपकाळे यांनी रात्रीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दीड वाजता पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेट दिली.
पोर्चमधील लाईट काढून ठेवला कुंडीत
12 वर्षापासून बंगल्याला कुलुप असताना कधीच चोरी झाली नाही, आता रहिवासासाठी आल्यानंतर आठच दिवस बाहेर गावी गेलो आणि चोरीचा प्रकार घडल्याचे अॅड. सपकाळे यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी नगरात बुधवारी देखील प्राध्यापकाकडे चोरी झाली होती. त्याच दिवशी ही चोरी झाल्याची शक्यता आहे. दरम्यान सपकाळे यांच्याकडे चोरट्यांनी भिंतीवरुन उड्या मारुन आत प्रवेश केला. यावेळी सर्वप्रथम पोर्चमधील सुरु असलेला लाईट काढून कुंडीत ठेवला. यानंतर चोरी केली. सपकाळे यांचा लाईट सुस्थितीत आढळून आला आहे.