जळगाव । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे 9 ऑक्टोबर 2014 रोजी झाडताना धुळ उडाल्याचा कारणावरून दाम्पत्याने विवाहितेला लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. शुक्रवारी या प्रकरणी न्यायाधीश भळगट यांनी मारहाण करणार्या दाम्पत्याला 6 महिन्याची शिक्षा सुनावली तर 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यातच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून 4 हजार रुपये देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आव्हाणे येथील अनिता राजेश भोई (वय 35) या 9 ऑक्टोबर 2014 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आंगण झाडत होत्या. त्यावेळी आंगणातील धुळ त्यांच्या बाजुला राहणार्या शोभाबाई पांडुरंग भोई (वय 30) हिच्या अंगावर उडली. त्यामुळे तिने अनिता भोई यांच्याशी वाद घातला. वाद सुरू असताना शोभाबाई भोईचा पती पांडुरंग डोंगर भोई (वय 35) याने घरातून लोखंडी सळईचा तुकडा आणून अनिता भोई यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कलम 323, 324 (34)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला न्यायाधीश भळगट यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात सरकारतर्फे अॅड. एस. आर. निकम यांनी 5 साक्षीदार तपासले. तर आरोपीतर्फे अॅड. एस. एन. चौधरी यांनी युक्तिवाद केला होता. मारहाण प्रकरणी न्यायाधीश भळगट यांनी शुक्रवारी भोई दाम्पत्याला कलम 324 (34) प्रमाणे दोषी धरले. त्यात त्यांना 6 महिने साध्या कैदीची शिक्षा आणि प्रत्येकी 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडाचे 4 हजार रुपये फिर्यादी अनिता भोई यांना देण्याचे आदेश न्यायाधीश भळगट यांनी दिले आहे.