लोणचे टाकण्यासाठी कैर्‍याची मागणी वाढली; आवक वाढल्याने दर घसरले

0

वरखेडी। पावसाळा सुरु झाला असून लोणचे बनविले जात आहे. लोणचे टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या कैर्‍या खरेदीसाठी वरखेडी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे मोठे बाजारपेठ आहे. गुरांचा बाजारासाठी हे ठिकाण प्रसिध्द आहे. गुरुवार हा वरखेडी आठवडे बाजाराचा दिवस असतो. कैर्‍यांची मागणी मोठ्या प्रमाणात असून आवक वाढल्याने कैर्‍यांच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. आठवडे बाजारात महिलांनी कैर्‍या खरेदीकरिता एकच गर्दी होती येथील ग्रामपंचायतच्या आठवडे बाजाराच्या आवारात कैर्‍यांच्या मोठा बाजार भरत असतो या बाजारात गुजरात, बलसाड, चिखली, सिल्लोड, बनोटी, भडगाव, चाळीसगाव, धरमपूर आदी भागातून वाहनातून कैरी विक्रीसाठी येत असतात. ठोक व्यापारी कैर्‍या घेऊन येत असतात. वरखेडीला लागुन अनेक खेडे असल्याने परिसरातील एकमेव आठवडे बाजार आहे.

मसाले विक्री जोरात
लोणचे अधिक काळ टिकावे यासाठी तेलासह विविध मसाले पदार्थ त्यात टाकले जातात. त्यामुळे मसाले पदार्थाची मागणी वाढली असून मसाले विक्री जोरात सुरु आहे. मागणी अधिक असल्याने मसाल्याचे भाव वाढले आहे.लवंग मिरे, मोहरिची दाळ, बडीशोप, हळद, मिरची, हिंग व तेल आदी साहित्यांचे भाव तेजीत आले आहे. बोगस मसाले पदार्थ देखील विक्रीस असल्याने महिलांमध्ये मसाले खरेदी करतांना कसरत होत आहे.

कैर्‍यांचे भाव
मागील आठवड्यापेक्षा या आठवडे बाजारात कैर्‍यांचे भावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. राजापुरी 25 ते30 रुपये किलो प्रमाणे तर गावराण कैरी 15 ते 20, सरदार 20 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. कैरी फोडून देणार्‍यांना देखील रोजगार मिळाला आहे. कैरी फोडणार्‍यांनी स्वतंत्र दुकाने थाटली आहे. 5 रुपये किलो प्रमाणे कैरी फोडून देत आहे. कैरी फोडण्याच्या कामातून दिवसभरातुन 1 ते 2 हजार रुपये कमवित आहे. चीनी बरणी व मातीच्या मडक्याचे भाव तेजीत आहेत. चीनीच्या बरण्या 75 रु पासून ते 700 रुपयापर्यत तर मातीचे मडके 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यत आहे. चीनी बाराण्यामध्ये लाणचे अधिक काळ टिकुन राहत असल्याने महिलांकडून चीनी बरण्यांची मागणी अधिक आहे.