भुसावळ। कैरी म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. खमंग, चवदार जेवणासोबत लोणच्याची एकतरी फोड असली, तर जेवणाचा मज्जाच न्यारा, आता या कैरीची प्रतीक्षा संपली असून पावसाचे आगमन होताच बाजारात कैरी विक्रीसाठी दाखल झाली आहे.
गेल्या वर्षापेक्षा यंदा बाजारात कैर्यांचे दरही
सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्यामुळे खमंगदार जेवणासोबत आंबट कैरीची चवही वाढली आहे. त्यामुळे रविवारच्या बाजारात कैर्या खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती. पावसाळा सुरु होताच घरोघरी गृहिणींची लोणचे टाकण्यासाठी धडपड सुरु होत असते. त्यामुळे आता कैर्यांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडे बाजारात कैर्यांची मोठी आवक होती. 20 ते 30 रुपये दराने त्या विक्री झाल्या.
चांगल्या प्रतीची कैरी बाजारात आल्यानंतर विक्री वाढणार
पहिल्या टप्प्यातील मोहराची आता कैरी तयार झाली असून बाजारात कैरीची आवक सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत कैरीची आवक वाढण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. सध्या कैरीची गळ होत असल्याने ही गळ झालेली कैरीच विक्रीसाठी बाजारात येत आहे. चांगल्या प्रतीची कैरी बाजारात आल्यावर विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
कैर्या फोडणार्यांना रोजगार
पहिला पाऊस आल्यानंतर कैर्यांचे लोणचे टाकले जाते. ग्रामीण भागासह शहरातही अनेक जण कैर्या घेऊन त्याचे घरी लोणचे बनवितात. पाऊस आल्याने झाडावरील कैर्या उतरविण्यास शेतकरी सुरुवात करतात. कैर्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरातही विक्रीसाठी आणल्या जातात. अर्थातच शहरातील आठवडे बाजारामध्येही अनेक कैरी विक्रेते आल्याचे दिसून आले. कैर्यांसोबत लोणच्यासाठी आवश्यक मसाले विक्रेते, कैर्या फोडून देणारे कारागिर यांनाही रोजगार मिळाला. कैर्या फोडण्यासाठी 10 रुपये प्रतिकिलो असे दर ग्राहकांकडून कारागिर किंवा मजूर घेत आहेत. त्यामुळे कैर्या फोडून देणार्यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे.
असे आहेत दर
बाजारात तोतापुरी, राजापुरी, गावराणी, घाटी आदी प्रकारच्या कैर्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. घाटी, सरदार, राजापुरी कैर्यांचे दर 20 रुपयांपासून होते. तर गावराणी कैरीला 25 रुपये किलोचा दर होता. गावराणी कैर्यांची आवक अधिक होती. या बाजारात तोतापुरी कैर्यांची आवकही बर्यापैकी झाली होती. सध्या बाजारात गळतीचा माल जास्त असल्याने त्याचे दरही कमी आहे. त्यामुळे स्वस्तात कैरी खरेदी करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनी बाजारात एकच गर्दी केली होती.