लोणावळा। पोलिस उपविभागीय कार्यालय, लोणावळा उपविभाग यांच्या वतीने उपविभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनिशप वक्तृत्व स्पर्धेत लोणावळा शहरातील अॅड. बापूसाहेब भोंडे विद्यालयाने सांघिक विजेतेपद पटकाविले, तर गुरुकुल विद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. समाजातील गुन्हेगारीशी सामना करताना पोलिस विभागाकडून जनजागृतीबाबत राबविण्यात येणार्या प्रचलित कार्यक्रमांमध्ये दूरगामी प्रभाव टाकू शकतील अशा उद्देशाने डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनिशप या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पोलिस दलाच्या कोल्हापूर परिक्षेत्राकडून करण्यात आले आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेला लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी डी.डी. शिवथरे, नगरसेवक निखील कवीश्वर, अपर्णा बुटाला, पोनि चंद्रकांत जाधव, पोनि प्रदीप काळे, सपोनि संदीप येडे पाटील, सपोनि खेडेकर, बापू पाटील, अमीन वाडीवाला, राजेश आगरवाल, राधिका भोंडे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अॅड.नीलिमा खिरे, डॉ.ममता काळे आणि डॉ.एम.एस. गायकवाड यांनी केले. सांघिक गटात अॅड. भोंडे विद्यालयाने प्रथम तर गुरुकुल विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तिक गटात भोंडे विद्यालयाच्या तेजेरोमयी बंडी या विद्यार्थिनीने तर द्वितीय क्रमांक गुरुकुलच्या श्रेया सूर्यवंशी हिने पटकाविला.
विविध विषयांवर विद्यार्थ्यांची मते
कोल्हापूर परिक्षेत्राचे डीजी विश्वास नांगरे पाटील यांच्या कल्पनेतून घेण्यात येत असलेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील पोलिस स्टेशननिहाय पातळीवरील स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या पुढील टप्यातील उपविभागीय स्तरावरील स्पर्धा सध्या सर्वत्र घेण्यात येत आहे. लोणावळा उपविभागीय कार्यालयाकडून घेण्यात आलेली स्पर्धा हॉटेल चंद्रलोक सभागृहात नुकतीच पार पडली. या स्पर्धेत लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव या पोलिस स्टेशन स्तरावर पार पडलेल्या स्पर्धेतील प्रत्येकी प्रथम दोन विजेत्या संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. सोशल मीडियाचा गैरवापर, वैष्णिक तापमानवाढ, बाल गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, भारतीयांप्रती परदेशातील वंशविद्वेश, वन्यजीव शिकार यांसारख्या ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मत मांडली.