लोणावळा : लोणावळा शहरात पर्यटनासाठी आलेल्या ताडदेव येथील युवकांच्या कारला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खंडाळा बोगद्यात झालेल्या अपघातात युवक व युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघात अन्य तीन युवक जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खंडाळा भोर घाटातील खंडाळा बोगड्यामध्ये दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा बोगद्यात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून डिजायर कार (एम. एच.01.ए. एक्स.6579) बोगद्याच्या भिंतीला धडकली. यात केविन कपाडिया (वय 20) आणि पंक्ती पारेख (वय 20, दोघे रा.मुंबई) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षिल शेठ (वय 19), धैर्य शहा (वय 19) आणि रजत गामी (वय 18) हे जखमी झाले. यातील रजत गामी याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तळेगाव येथील पायोनीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खंडाळा महामार्ग पोलीस तात्काळ अपघातस्थळी पोचले आणि मदतकार्य सुरू केले. पाचही आपल्या अन्य 3-4 मित्रमैत्रिणीसह मंगळवारी लोणावळ्यात पर्यटनासाठी आले मंगळवारी ते तेथेच राहिले होते. बुधवारी दुपारी परतत असताना हा अपघात झाला. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस अरविंद काटे करीत आहेत.
राजगुरुनगर : दावडी येथील गाडगेवस्ती रस्त्यावरील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडली. यामध्ये चालक राजेंद्र धनाजी गव्हाणे (40, रा. धामणटेक) याचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.