लोणावळ्यातील दुहेरी खूनप्रकरणाचे गूढ उकलेना

0

लोणावळा : येथील सहारा मार्गालगत आयएनएस शिवाजी डोंगरावर झालेल्या दुहेरी खूनप्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. या प्रकरणात पोलिसांनी मयत विद्यार्थ्यांचे नातेवाईक, मित्रमंडळींचे जबाब नोंदवले. मात्र, त्यातून कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागलेले नसल्याने पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीत. पोलिसांच्या तपासाला दिशा मिळत नसल्याने या खूनप्रकरणातील आरोपी मोकाटच आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार, या खूनप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची 10 ते 12 पथके तयार करण्यात आली आहे. मात्र, तरीही तपास पुढे सरकत नसून दोन्ही विद्यार्थ्यांच्या खुनाचे कारण समोर आलेले नाही.

दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी
लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे सार्थक दिलीप वाघचौरे (वय 22, रा. सात्रळ, राहुरी, जि. नगर) व श्रुती संजय डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर, पुणे) या दोघांचा अज्ञातांनी निर्घृण खून केला होता. ही घटना लोणावळा येथील सहारा मार्गालगत आयएनएस शिवाजी डोंगरापासून काही अंतरावर घडली होती. ही घटना समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नसल्याने हे खूनप्रकरण का घडले, दोघांचा खून कोणी केला, यासारखे अनेक प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहेत.

खुनाचे कारण अस्पष्टच
या खूनप्रकरणाचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. पर्यटक म्हणून आलेल्यांनी हा खून केला किंवा महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांपैकी कुणी सूड भावनेतून दोघांना संपवले, अशा सर्व बाजुंनी पोलिस तपास सुरू आहे. टायगर पॉईंट, लायन पॉईंट भागातील कुणी व्यावसायिकांचा खुनात हात आहे किंवा नाही, याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. पुरावे गवसल्यानंतर पोलिस एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहचू शकतात. त्यादृष्टीने तपासकाम सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

अधिकारी तपासकामात गुंतले
या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह स्थानिक पोलिस कर्मचारी तपासकामात गुंतले आहेत. पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. शिवतारे, पोलिस अधिकारी राम जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव त्यांच्या सहकार्‍यांसह तपासकामात व्यस्त आहेत. दरम्यान, लोणावळ्यातील या दुहेरी खूनप्रकरणामुळे पर्यटननगरी बदनाम झाली आहे. येथील व्यावसायिक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, जीप चालक व मालक तसेच चिक्की उत्पादक, लहान-मोठे दुकानदार यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.