लोणावळा : येथील ओळकाईवाडी येथे पत्नी आणि मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करणाऱ्या पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून दोन महिलांना अटक करण्यातआली आहे.या प्रकारणातील एक आरोपीअद्याप ही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहिरा अजीज शेख (वय ४०) व रजिया मेहबूब शेख (वय ३७, दोघेही रा. क्रांतीनगर, ओळकाईवाडी, लोणावळा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून मुबिन मेहबूब शेख हा आरोपी अद्यापही फरार असून लोणावळा ग्रामीण पोलिस शोध घेत आहेत.
ओळकाईवाडी मधील क्रांतीनगर येथे रविवार (दि.२५) रोजी एका घरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तर ९ वर्षांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी अधिक तपास केला असता पत्नीचे शेजारी राहणाऱ्या मुबिन मेहबूब शेख या मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाने चिडून गेलेल्या बबन धिंदळे याने पत्नी दिपाली व मुलगी दीप्ती यांची गळा आवळून हत्या केल्याची तसेच त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. सदर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत वरील आरोपींनी संगनमताने बबन धिंदळे आणि त्याची पत्नी दिपाली धिंदळे यांना मुबिन-दिपाली प्रेम प्रकरणावरून वारंवार मानसिक त्रास दिल्याचे सांगण्यात आले असून यात्रासाला कंटाळूनच बबन धिंदळे याने हत्या करून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी दोन्ही महिलांना अटक करण्यात आली असून मुबिन शेख फरार झाला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीणच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड़ हे करीत आहेत