लोणावळा : चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवून कामशेत व लोणावळा परिसरातील अनेक महिलांची लाखो रूपयांची फसवणूक करून पती-पत्नी गंडा घालून पळून गेले. तीन महिन्यांपूर्वी कामशेत व लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, त्याचा पोलिसांना थांगपत्ता लागत नसल्याने महिला ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
लोणावळ्यातील बंटी और बबली बेपत्ता
लोणावळा-भांगरवाडी येथील राजू दत्तात्रेय गायकवाड व त्याची पत्नी सुनीता या दोघांनी चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळातील लोणावळा, कामशेत, मळवली, तळेगाव, कार्ला व इतर गावांतील अनेकांनी या ठिकाणी गुंतवणूक केली. सुरुवातीला हे दांपत्य ठेवीदारांच्या घरी जाऊन परतावा देऊ लागले. त्यामुळे महिलांचा विश्वास बसल्याने ठेवी ठेवण्यासवाठी रीग लागली. या ठेवी ठेवताना अनेक महिलांनी आपल्या कुटुंबीयांना कल्पना दिली नाही. शेवटी हे दांपत्य 8 ऑगस्टला पसार झाले. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची शोधाशोध सुरू आहे. परंतु, त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
मुद्दलही गमावली
राजू गायकवाड हा सहारा सिटीत कामाला होता. त्याची पत्नी बँकेच्या दैनंदिनी ठेवी गोळा करायची. यामुळे अनेक महिलांच्या ओळखी झाल्या. त्यानंतर चिटफंडाच्या नावाखाली 2012पासून दुप्पट परतावा देण्याचे काम सुरू केले. अनेकांना त्याचा फायदा होत गेला. कालांतराने पैसे ठेवण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली. काही महिलांनी दुप्पट रकमेच्या आशेने दागिने मोडले तर कुणी जमिनी विकून रक्कम गुंतवली. 8 ऑगस्टला हे दांपत्य भांगरवाडीतील सदनिकेला कुलूप लावून निघून गेले. व्याजाला मुकले आणि मुद्दलही गमावली अशी वेळ महिलांवर आली आहे. याबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.आर. चव्हाण म्हणाल्या, आमच्याकडे चार ते पाच महिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तक्रारीसाठी संपर्क साधावा. कामशेत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब खेडेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात याबाबत तपास सुरू आहे. वेगवेगळी पथकेही पाठवली होती. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. तरीही लवकर या गुन्ह्याचा छडा लावला जाईल.