लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सांगता

0

लोणावळा : येथे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेची यशस्वी सांगता मुंबई येथील त्रिनेत्र फाउंडेशन प्रस्तुत डॉ. ताई पाटील संचलित सुरमयी मैफल ‘सूरनेत्र’ या अंध कलाकारांच्या सुमधुर संगीत व वादन या कार्यक्रमांनी झाली. वसंत व्याख्यानमाला समितीच्या वतीने आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत साहित्य, कला-क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्म, इतिहास, तंत्रज्ञान क्षेत्रातील ख्यातनाम व्याख्यात्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

ही वैचारिक मेजवाणी
समारोपाला नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, त्रिनेत्रच्या डॉ. ताई पाटील, अ‍ॅड. माधवराव भोंडे, वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा प्रा. वसुधा पाटील, सचिव आनंद गावडे यांच्यासह सदस्य व विविध क्षेत्रातील रसिक श्रोते उपस्थितीत होते. आठवडाभर सुरू असलेल्या 15व्या वसंत व्याख्यानमालेत माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी ‘गुण गाईन आवडीने’, दुर्ग संवर्धक प्रफ्फुल्ल माटेगावकर यांनी ‘सह्याद्रीतील सात रत्ने’ संवाद गडकोटांशी, प्रवीण दवणे यांनी ‘सावर रे’, दीपस्तंभ, मनोबल संस्थेचे अध्यक्ष यर्जुवेंद्र महाजन यांनी ‘शिक्षण व करिअर वर बोलू काही’, विवेक सावंत यांनी ‘भागीदारी मानवी व कृत्रिम बुध्दिमत्तांची’, प्रा. संध्या देशपांडे यांनी ‘बहिणाबाई’ संत तुकारामांच्या शिष्या या आध्यात्मिक विषयावर व्याख्यान सादर केले. तर त्रिनेत्रच्या अंध कलाकारांनी सुमधुर आवाज व संगीत वादनाने रसिकांची मने जिंकून व्याख्यानमालेची संध्याकाळ संगीतमय करून यशस्वी सांगता केली. सूत्रसंचालन दीप्ती मलवार, प्रास्ताविक प्रा. वसुधा पाटील यांनी केले.