लोणावळ्यात पावसाचा जोर

0

लोणावळा । लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारपासून पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 111 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

श्री गणेशाच्या आगमनासोबत शुक्रवारी सकाळी हजेरी लावलेल्या पावसाने शनिवारी ही आपला जोर कायम ठेवला. पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी पडले. त्यातच शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्ट्या जोडून आल्याने आणि बाहेर जराही विश्रांती न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळेकर नागरिकांनी घरात बसून गणेशाची पूजाअर्चा करणे आणि कुटुंबासोबत वेळ घालविणे पसंद केले. यामुळे बाजारपेठेतही गर्दी कमी दिसत होती. पावसामुळे शहरातील भांगरवाडी, वलवण, तुंगार्ली, नांगरगाव, आंबरवाडी तसेच ग्रामीण पट्ट्यातील डोंगरगाव, कुसगाव येथील सखल भागात व मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.