लोणावळ्यात मार्शल आणि दामिनी पथक यंत्रणा कार्यान्वित

0

गुन्हे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी प्रयत्न : 5 दुचाकी तैनात

लोणावळा । लोणावळा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे गुन्हे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारी एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी त्वरित पोचून मदत कार्य करणे तसेच पोलिस कारवाई सुरू करणे यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली बिट मार्शल आणि दामिनी पथक यंत्रणा लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नुकतीच कार्यान्वीत करण्यात आली.

पुणे, मुंबई या महानगरांमध्ये वरील दोन्ही यंत्रणा कार्यान्वीत असून त्याच धर्तीवर ही बिट मार्शल आणि दामिनी पथक यंत्रणा काम करणार आहे. दुचाकीवरून पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे, पोलिस स्टेशन तसेच पोलिस कंट्रोल रूममधून कॉल आल्यास ठराविक वेळेच्या आत घटनास्थळी पोहचणे, घटनेची संपूर्ण माहिती पोलिस स्टेशनला तसेच कंट्रोल रूमला कळविणे, भांडण, मारामारी सारखी घटना असल्यास त्यातील जखमींना सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये पोचवण्याची व्यवस्था करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे असे या बिट मार्शलचे काम असणार आहे. तर महिलांचा ज्या ठिकाणी जास्त वावर असतो जसे शाळा कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजारपेठ इत्यादी ठिकाणी दामिनी पथक कार्यान्वित राहणार आहे.

दुचाकींना जी.पी.एस. सिस्टीम
लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बिट मार्शल व दामिनी पथकासाठी एकूण 5 दुचाकी तैनात करण्यात आल्या आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनसाठी यातील 2 दुचाकी बिट मार्शल आणि 1 दुचाकी दामिनी पथकासाठी तर ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी 1 दुचाकी बिट मार्शल तर 1 दुचाकी दामिनी पथकासाठी देण्यात आली आहे.

या दुचाकी जी.पी.एस. सिस्टीम, सायरन, वॉकी टॉकी, मोबाईल, लाठी, प्रथमोपचार पेटी यांनी सुसज्ज आहेत.

नगराध्यक्षांच्या हस्ते पथकांचा श्रीगणेशा
लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या दोन्ही पथकांचा श्रीगणेशा केला. यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार, सुनील तावरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.