लोणावळ्यात मुसळधार पाऊस; सतर्कतेचा इशारा

0

वलवण धरणातून पाणी सोडण्याचे संकेत

लोणावळा । मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच शहराला मंगळवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून टाटा पॉवर कंपनीने वलवण धरणातून पाणी सोडण्याची सूचना दिल्याने शहरात अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वलवण धरण 90 टक्के भरले असून टाटा पॉवर कंपनीकडून पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी सोडण्याचे संकेत लोणावळा नगरपरिषदला देण्यात आले आहे. यामुळे लोणावळा शहरात अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खंडाळा घाटाखालील खोपोली शहरालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पाच गावांचा संपर्क तुटला
लोणावळ्यात यंदा एकूण 4635 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद मंगळवारी सकाळी करण्यात आली. धरणातील पाणी सोडल्यास नगरपरिषद हद्दीमधून जाणार्‍या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर देखील पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला कोणत्याही प्रकारे धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मावळ तालुक्यातील पवनानगर धरणामधून 5970 क्यूसेकने पाणी पवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मागील तीन दिवसात दुसर्‍यांदा पवना नदीवरील शिवली पूल पाण्याखाली गेला असून 4 ते 5 गावांचा तसेच वाड्यांचा संपर्क तुटला आहे.