लोणावळा : भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन लोणावळा शहरात सोमवारी मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध भागात सरकारी कार्यालये, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, पक्षीय कार्यालये तसेच शाळा कॉलेज मधून मोठ्या इतमामात भारतीय तिरंगा फडकविण्यात आला.
सोमवारी 15 ऑगस्ट च्या सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या हस्ते तर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचार्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. या प्रसंगी लोणावळा ग्रामीणच्या प्रभारी अधिकारी साधना पाटील, स.पो.नि.अरविंद काटे, पो.उप.नि.प्रकाश शितोळे, शिवाजी दरेकर, दिलीप होले, बालाजी गायकवाड, माधवी देशमुख यांच्यासह पोलीस बंदोबस्तासाठी मुख्यालयातून आलेले काही अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यावतीने शहरातील हनुमान टेकडी या झोपडपट्टी परिसरात राहणार्या गरीब शाळकरी मुलांना पादत्राणांचे वाटप करण्यात आले. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणीही तेथील प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नगरपरिषदेच्या आवारात पारितोषिक वितरण
लोणावळा नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या आवारात यंदा प्रथमच नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आजीमाजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमानंतर नगरपरिषद रुग्णालयात उत्कृष्ट काम केलेल्या नर्स ला कै. भाऊसाहेब साळवेकर पारितोषिक तसेच नगरपरिषद प्राथमिक शाळेत उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांना कै. विमलादेवी रामसिंग सिसोदिया पारितोषिक प्रदान करण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांमध्ये सामाजिक उपक्रम
याशिवाय लोणावळा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. बी.एन.पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमधूनही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, शाळा क्र.07 वलवण याठिकाणी याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाळेकर यांच्या वतीने शंभर मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले, तर नगरसेविका सेजल परमार यांच्यावतीने पाण्याची टाकी शाळेला भेट देण्यात आली. याशिवाय लोकमान्य टिळक विद्यालय, नांगरगाव शाळेत शिक्षण मंडळ माजी उपसभापती प्रदीप थत्ते मित्र मंडळाच्या वतीने मुलांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.