लोणावळा : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनासोबतच लोणावळ्यात पावसाची संततधारदेखील सुरूच असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मागील 48 तासात लोणावळा शहरात 253 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे लोणावळा व मावळातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, इंद्रायणी व पवना या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. लोणावळ्यात यंदाच्या मोसमात सुमारे 4481 मिलीमीटर (176.42 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाची सरासरी गाठण्यासाठी आता केवळ चार इंच पाऊस कमी आहे, अशी माहिती मिळाली.
पावसाची वाटचाल द्विशतकाकडे
रविवारीदेखील शहरात पावसाची रिमझिम सुरूच होती. येत्या दोन दिवसात पाऊस मागील वर्षाची सरासरी ओलांडत द्विशतकाकडे वाटचाल करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ऐन गणपती उत्सवात पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना देखावे, आरास पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी भर पावसातदेखील आरास व देखावे पाहणीसाठी सुरू ठेवले आहेत.