लोणीकाळभोर ग्रामपंचायतीची माहिती मिळणार एका क्लिकवर

0

हवेली । भविष्य काळात लोणी काळभोर ग्रामपंचायतीकडून चांगल्या योजना अपेक्षित असल्याचे मत हवेली उपविभागाचे पोलीस अधिकारी सुहास गरूड यांनी व्यक्त केले. लोणीकाळभोर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सोयीसाठी विकसित केलेल्या अँडॉइड अ‍ॅपचा शुभारंभ गरूड यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब कौंडुभैरी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. लोणी गावात भरपूर सुधारणा झाल्याचे दिसते. त्यामुळे आता डिजीटल ग्रामपंचायती सारखी कामे करून गावाचे नाव चांगले गाजले पाहिजे, असे गरूड यांनी सांगितले.

डिजिटल गाव
लोणीकाळभोर गाव आता डिजिटल गाव म्हणून ओळखले जाणार आहे. या ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती, लोकसंख्या, भौगोलिक स्थान, ऐतिहासिक वारसा या सर्व गोष्टींची माहिती एका क्लीकवर मोबाईलवर मिळणार आहे, असे सरपंच वंदना काळभोर यांनी सांगितले. ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयाची माहितीही येथे अपडेट राहणार आहे.

विकास कामांची मिळणार माहिती
आरोग्य विषयक माहिती मध्ये दवाखाने, मेडिकल दुकान यांची माहिती व फोन नंबर या अ‍ॅपमुळे उपलब्ध होणार आहेत. तसेच आरोग्य खात्यातील विविध उपक्रमांचीही माहिती मिळणार आहे. गावातील विकास कामांची माहिती फोटोसह या अ‍ॅपमध्ये असणार आहे. नागरिकांना विविध दाखल्यासाठी सतत हेलपाटे मारावे लागत असे आता एका क्लिकवर दाखला मिळणार आहे. तसेच या अ‍ॅपचा खर्च भागविण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे, असे हे अ‍ॅप असणार असल्याची माहिती काळभोर यांनी दिली.

खेळाडूंना अनुदान
लोणी काळभोर ग्रामपंचायतीमार्फत दुसरी एक योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देताना उपसरपंच योगेश काळभोर म्हणाले की, वृद्ध आणि जेष्ठ नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी ग्रामपंचायतीमार्फत करून औषधे पुरवली जाणार आहेत. तालुका, जिल्हा व त्यावरील स्तरावरील बक्षीसपात्र खेळाडूंना प्रोत्साहनपर अनुदान देणे, शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुलींच्या जन्माचे होणार स्वागत
2 आक्टोबर 2016 नंतर जन्मलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील मुलींच्या जन्माचे स्वागत म्हणून 3 हजार रुपयाचे बचत प्रमाण पत्रे देण्यात येणार असल्याचे योगेश काळभोर यांनी सांगितले. या सर्व योजनांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी एम. पी. चव्हाण यांनी सांगितले की, या अ‍ॅपमुळे ग्रामस्थांना घर बसल्या कराचा भरणा करता येणार आहे. जि. प. सदस्य सुनंदा शेलार, युगंधर काळभोर, माधव काळभोर, प्रताप गायकवाड, राहुल काळभोर, प्रशांत काळभोर, मनोज काळभोर आदींसह ग्रामपंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.