मारवड पोलिसांची कारवाई : संचालकांसह तत्कालीन संचालकांचा समावेश
अमळनेर- तालुक्यातील लोण बु.॥ येथील विविध कार्यकारी सोसायटीमधील 24 लाखांच्या अपहार प्रकरणी कृउबा संचालकासह तत्कालीन 9 संचालकांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातील दोन संचालकांना अटक अद्याप बाकी आहे. तालुक्यातील लोण येथील विविध कार्यकारी सोसायटीत शेतकर्यांच्या नावे खोट्या सह्या करून कर्ज घेणे पात्र नसताना कर्ज देण्यात आले होते तर 24 शेतकर्यांच्या नवे बनावट कर्ज घेऊन 24 लाखांच्या अपहार तत्कालीन संचालकांनी केला होता. लेखा परीक्षणात दोष आढळून आल्यानंतर जानेवारी महिन्यात मारवाड पोलिसात तत्कालीन 11 संचालकांविरुद्ध भादंवि 408, 409, 420, 465, 466, 468, 471 प्रमाणे तत्कालीन संचालकांविरुद्ध फसवणूक बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी कृउबा संचालक विश्वास बाजीराव पाटील, राजधर महिफत पाटील, वसंत शंकर पाटील, विनायक परशुराम पाटील, खंडेराव चुडामण पाटील, अविनाश यशवंत पाटील, प्रल्हाद उर्फ परमेश्वर रामदास पाटील, सचिन प्रल्हाद पाटील, शिवाजी भालचंद्र पाटील यांना मारवड पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली. आरोपींना अमळनेर कारागृहात नेण्यात आले आहे. दरम्यान, अजून दोन संचालकांना लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती सहा.निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी दिली.