जामनेर: लोणी येथील 19 वर्षीय युवतीचा जामनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 26 रोजी मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत कोरोना साथरोग आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणताही संशयित मृत्यू हा कोरोना मृत्यू समजुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते.त्यानुसार सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. याबाबत बुधवारी तालुकास्तरीय टीमने लोणी येथे मृताच्या संपर्कातील व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करून त्या सर्वांचे समुपदेशन केले. 16 लोकांना कोरान्टीन करण्यात येऊन माहिती सरपंच व पोलीस पाटील यांना देण्यात आली.
यामध्ये 6 हाय रिस्क कॉन्टॅक्ट 10 लो रिस्क कॉन्टॅक्ट होते. खबरदारीचा उपाय म्हणून फत्तेपूर येथील महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेट देऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी दवाखाना 3 दिवस बंद करून दररोज ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. रिपोर्ट येईपर्यन्त स्वतः व कंपाउंडर कोरोंटाईन राहणार असल्याचे सांगितले. तसेच फत्तेपुर येथील लॅबच्या एका रक्त संकलकाला सुद्धा कोरंटाईन करण्यात आले आहे.
आरोग्य सेविका प्रतिभा वानखेडे, आरोग्य सेवक कृष्णा शिंदे, अनिता वाघ, कल्पना सुरळकर, भारती आहेर व रेखा चिकटे यांनी पर्यवेक्षक भागवत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व घरांचा तापाचा सर्वे करण्यात आला. यामध्ये 300 व्यक्तींचा सर्वे करण्यात आला. यामध्ये 3 व्यक्तींना किरकोळ ताप आढळून आला. सर्वेक्षण हे रोज पुढील 14 दिवस चालणार आहे.
तालुकास्तरीय टीमचा समावेश
तालुकास्तरीय टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ.योगेश राजपूत, डॉ.कुणाल बावस्कर, डॉ.सागर सोनाळकर, डॉ.किरण धनगर, डॉ.धनंजय राजपूत, व्ही.एच.माळी, बशीर पिंजारी यांचा समावेश होता. ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली. सर्वेक्षण कामी नारायण लोखंडे, प्रमोद पाटील, पी.एम.चव्हाण यांचे सहकार्य लाभले.