लोणावळा : दुर्गसंवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोहगड विसापूर विकास मंचाला शंभूसेवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या 328व्या बलिदान दिनानिमित्त वढु बु. येथे मृत्युंजय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
17 वर्षापासून योगदान
गेली 17 वर्षे मंच मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर किल्लयांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. लोहगडावरील शिवमंदिर व पायथ्याला साकारलेले शिवस्मारक आदी कामे मंचाने पूर्ण केली आहेत. तसेच पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून लोहगडाच्या पायर्या, तटबंदी व बुरुजांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गडावर मद्यपान व अनैतिक प्रकार पूर्णपणे बंद झाले. पर्यटन वाढले व पर्यायाने स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. पुरातत्व विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर किल्लयावरील पडलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिशन रायगड
तसेच दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील मावळ तालुक्यातून शेकडो शिवभक्त शिवपुण्यतिथीनिमित्त 11 एप्रिल 2017 ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी जाणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली. दरम्यान, दुर्गसंवर्धनासाठी मावळातील तरूण उभा ठाकला असून त्यामुळे गळवाटा आणि परिसराचे पावित्र्य राखली जात आहे. गळ, कोट, किल्ले हीच शिवरायांची खरी स्मारके असून ती संवर्धन करणे हीच शिवभक्ती होय.