लोहगाव विमानतळच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

0

पहिल्या टप्प्यात 358 कोटींची विकासकामे

पुणे : लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून 20 ऑक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणाच्या कामाच्या रखडलेल्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सुसज्ज इमारतीसह 358 कोटी रुपयांची विविध विकासकामे केली जाणार आहेत. मागील काही वर्षांपासून लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम रखडले होते. एकीकडे विमान प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असताना विस्तारीकरणाअभावी प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देणे शक्य होत नव्हते. तसेच विमान उड्डाणांच्या संख्येवरही मर्यादा येत आहेत. पुढील वर्षापर्यंत प्रवाशांची संख्या एक कोटीचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विस्तारीकरण करणे आवश्यक होते. आता जागेसह त्यामधील सर्व अडथळे दूर झाले आहेत.

वडापाव, भेळीवर मारा ताव

विमानतळावर गेले की तेथील चकचकीत रेस्टॉरंटमध्ये सहसा फास्टफूडच जास्त मिळते. त्यांच्या किंमतीही जास्त असतात. त्यामुळे अनेकजण याठिकाणी जाणे टाळतात. पण आता लोहगाव विमानतळावर वडापाव आणि भेळीवरही ताव मारता येणार आहे. विमानतळावर लवकरच भेळ आणि वडापावचे आउटलेट सुरू केले जाणार असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक पदार्थ उपलब्ध करून देण्याची मागणी होती, असे अजय कुमार यांनी सांगितले.

800 कोटींचा निधी मंजूर

संरक्षण मंत्रालयाकडून विस्तारीकरणासाठी 16 एकर जागा मिळाली आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून 800 कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. 20 ऑक्टोबरला या कामाचे भुमीपूजन होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार आहे. पुढील तीन ते साडेतीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे आणि विमानतळ संचालक अजयकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन धावपट्टीसाठी 250 एकर जागेची गरज

पहिल्या टप्प्यात 42 हजार चौरस मिटर क्षेत्रफळाची इमारत उभारली जाईल. या इमारतीमध्ये पार्किंग, पाच सरकते जिने यांसह प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील. कार्गो आणि विमान कंपन्यांच्या विमानांसाठी 10 एकर जागेचा वापर केला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले. विस्तारीकरणासाठी परिसरातील आणखी 35 एकर जागा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. तसेच नवीन धावपट्टीसाठी 200 ते 250 एकर जागेची गरज असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.