लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच

0

पुणे । लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. संबधित जागा मालकांशी बोलून जागेचा आगाऊ ताबा घ्या, जागा ताब्यात आल्याचे पत्र माझ्याकडे पाठवा. आठ दिवसांत हवाई दलाशी बोलून प्रश्‍न मार्गी लावतो, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.

विधानभवन येथे राष्ट्रीय महामार्गाशी संबधित विषयांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित केला. हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोहगाव येथील विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील वर्षभरापूर्वी पुण्यात येऊन बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लगतची 15 एकर जागा ताब्यात देण्यास हवाई दलाने तत्वत: मान्यता दिली होती.

तसेच विमानतळाच्या 900 मीटरच्या परिसरातील नो डेव्हलपमेन्ट’मधील खासगी जमीन मालकांची जागा ही ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करून तो मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यास मान्यता देखील मिळाली. मात्र, विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जागा अजून ताब्यात येऊ न शकल्याने हे काम सुरू झाले नाही. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या पंधरा एकर जागेच्या भूसंपादनाकडे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. त्यावर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अडचणी निदर्शनास आणून दिल्या.

प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत
लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली खासगी तीन मालकांची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेच्या भूसंपादनासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे या जागेचा मोबदला टीडीआर’ स्वरुपात देण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका तयार करून तो नगर विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.