वाढत्या प्रवासी संख्येमुळे विविध सोयीसाठी अनेक प्रकल्प हाती
विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार अनिल शिरोळेंची माहिती
पुणे : लोहगाव विमानतळावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता विमानतळाचा विस्तार करण्यात येत आहे. 2017-18 मध्ये प्रवासी संख्या 81 लाख 60 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर प्रसाधनगृह उभारणीपासून ते टर्मिनलच्या विस्तारीकरणाचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, त्याचाच भाग असलेल्या विमानतळाच्या नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलच्या निविदेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे.
358.89 कोटीची निविदा
विमानतळाच्या प्रस्तावित नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलचे काम ‘आरडीटी सेमेंटेशन इंडिया लिमिटेड’ कडे सोपविण्यात आले असून हे काम येत्या 30 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलची निविदा 31 ऑगस्ट रोजी मंजूर झाली आहे. आरडीटी सेमेंटेशन इंडिया लिमिटेड या कंपनीची 358.89 कोटी रुपयांची निविदा सर्वात कमी ठरली. त्यामुळे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. अशी माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.
४० हजार चौ. मी. टर्मिनल
नवीन टर्मिनल 40 हजार चौरस मीटर जागेत उभे केले जाणार आहे. सध्याचे टर्मिनल 22 हजार 300 चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत असून त्याचे देखील नूतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नवीन टर्मिनल उभे राहिल्यानंतर लोहगाव विमानतळाचे टर्मिनल 62 हजार 334 मीटर होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून देशभरातील विमानतळांवर विविध विकास कामे करण्यात येणार असून, त्यात पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. शहरात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विमानतळावर नवीन सुविधा उभारण्यात येत आहेत.
नोव्हेंबरपासून कामाची शक्यता
विमानतळ प्रशासनाने पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यांतर्गत नुकतीच लोहगाव विमानतळ येथे पर्यावरण विषयक सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली. एक महिन्यात पर्यावरण विभागाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.