फैजपूर- शहरात सालाबादाप्रमाणे अखंड भारताचे जनक तथा लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पटेलांचे जगातील सर्वात मोठा शिल्प (स्टॅचू) गुजरातमध्ये तयार करण्यात आला आहे. या महाकाय शिल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पटेल यांच्या जयंतीदिनी होत असल्याने या जयंती महोत्सवास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ऐतिहासिक फैजपूर शहरात हा जयंती सोहळा व आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी समाजातील तरुणांनी एकत्रीत येऊन या महत्वपूर्ण वर्षांपासून पटेल जयंती महोत्सव हा राष्ट्र, समाज प्रबोधनाला समर्पित व सकारात्मक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लेवा प्रतिष्ठान फैजपूर संघटन स्थापन करण्यात आले आहे. लेवा प्रतिष्ठानतर्फे शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायत सदस्य तथा माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी होते. यात पटेल जयंती साजरी करण्यात येणार असून याच बॅनर खाली वर्षभरात विविध प्रकारचे समाज हिताचे कार्यक्रम राबविण्याचा मानस करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, मिलिंद वाघूळदे, माजी उपनगराध्यक्ष केतन किरगे, संजय सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हरीभाऊ सराफ यांनी केले. यावेळी नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, रवींद्र होले, दीपक होले, तुकाराम बोरोले, राजेश महाजन, संजय रल, राकेश सराफ, जितू वाघूळदे, लेवा प्रतिष्ठानचे राजेंश चौधरी, धीरज नारखेडे, भरत कोल्हे, हरीभाऊ सराफ, रीतेश चौधरी, कृणल कोल्हे, श्याम भंगाळे, प्रतीक वारके, यश चौधरी, हिमांशू राणे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.