लोहमार्गावरील ‘तो’ धोकादायक खांब हटविण्यात येणार

0

रेल्वे प्रशासनाने दिले लेखी पत्र; फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे आंदोलन स्थगित

देहूरोड । देहूरोड रेल्वे स्थानकापासून सुमारे सातशे मीटर अंतरावरील बोगद्यात असलेला धोकादायक खांब अनेक रेल्वे प्रवाशांच्या अपघातास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हा धोकादायक खांब हटविण्यात यावा, अशी मागणी फुले-शाहु-आंबेडकर विचारमंचच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीसाठी गुरुवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, ही मागणी योग्य असून, याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्यात येईल, अशी हमी रेल्वे प्रशासनाकडुन देण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी विचारमंचच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात नुकतेच लेखी पत्र दिले आहे.

देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली 167/12 हा खांब धोकादायक बनला आहे. या भागातून रेल्वे जाताना खांबाचे अंतर अतिशय कमी असल्याने दरवाजातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या खांबांची धडक लागते. अशा अपघातात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. मागील महिन्यात या खांबामुळे एका तरुणीसह सुमारे चारजण या खांब्याच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

गुरुवारी याच मागणीसाठी विचारमंचच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, रेल्वेचे पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील, ओव्हरहेड विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता महावीर सिंग तसेच स्थानक प्रबंधक सुनील ढोबळे यांनी आंदोलनापूर्वीच त्याची दखल घेऊन संबंधित मागणी रास्त असल्याचे मान्य केले. यावेळी आनंद ढिलोड, उत्तम हिंगे, देवराम डोके, वीरेंद्र गायकवाड, शंभू पांडे, अजय कोटफोडे, इक्बाल शेख, रेल सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही. एन. थोरात उपस्थित होते.