लोहारा । सरपंचा चित्रा महाजन यांना पार्टीने ठरवून दिलेली दोन वर्षाची मुदत 18 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपुर्त केला. चित्रा महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता लोहारा सरपंचपदी कोण विराजमान होणार? याची उत्सुकता नागरीकांना लागली आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी येथे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच अक्षय जैसवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत 7 पैकी 11 सदस्य निवडून आणून ग्राम पंचायतित सत्ता स्थापन केली होती.
सरपंचपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने माळी समाजाच्या चित्रा महाजन यांची सरपंच म्हणुन निवड करण्यात आली होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे 2 वर्षासाठी सरपंचपद हे सौ. महाजन यांना देण्यात आले. त्यामुळे ठरलेली मुदत संपल्याने काल चित्रा महाजन यांनी पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. सरपंचपदाबाबत जरी उत्सुकता असली तरी देखील बहुमत असल्यामुळे अक्षय जैसवाल यांच्याच गटाचा सरपंच निवडला जाईल हे जरी निश्चित असले तरी या गटाकडून आशा चौधरी यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे दिसुन येत आहे. अक्षय जैसवाल गटाची सरपंच निवडीची तारीख लागल्यानंतर बैठक होणार असून त्यातच पुढील सरपंचपदाचा उमेदवार ठरविले जाणार असल्याची माहिती जैस्वला यांनी दिली. आज जरी आमचे 6 सदस्य दिसत असले तरी वेळेवर चमत्कार घडून आमच्याच गटाचा सरपंच देखील होऊ शकतो, असे मत विरोधी गटाचे पॅनल प्रमुख शरद सोनार यांनी सांगितले.