नांदेड । प्रयत्न केल्याने काय होत नाही…मेहनत, जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील पालकत्व हरवलेल्या नेहा नरेंद्र पवार हिला आला आहे. खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये टॉपर येण्याचा विक्रम केला आहे. स्पर्धेच्या युगात युपीससी, एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातुन अधिकारी होण्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये राहून खाजगी शिकवणी लावतात. मात्र प्रत्येक वर्षी तुटपुंज्या जागा निघाल्यामुळे अनेकांना मेहनत करूनही संधी मिळत नाही. लोहा येथील रहिवाशी असलेल्या नेहा नरेंद्र पवार या विद्यार्थिनींने एमपीएससीच्या एकच नव्हे तर दोन परीक्षेत यश मिळविले.
कौटुंबिक पार्श्वभूमी बेताचीच
विक्रिकर निरिक्षक या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. एमपीएससीतर्फे घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी पदासाठीच्या परीक्षेचा निकाल 21 एप्रिल रोजी लागला. यात सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत पहिल्या आणि विक्रिकर निरिक्षकमध्ये दुसर्या प्रयत्नात महिला खुल्या गटात तिसरा आणि पहिला क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान नेहाने पटकावला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळवता आले असल्याचे नेहाने सांगितले. नेहाच्या वडिलांचे 18 वर्षांपुर्वीच निधन झालेले आहे. यानंतर आईनेच दोन्ही मुलींचा सांभाळ करत शिक्षण दिले. नेहाची मोठी बहिण नयना हिने एमपीएससीची तयारी करत विक्रिकर निरिक्षक परीक्षेत यश मिळवले. नेहाने खाजगी कंपनीतील नोकरी सोडून नांदेड येथे स्पर्धापरीक्षांची तयारी सुरू केली होती.