मुंबई | देवदासी प्रथेच्या निर्मूलनासह भटक्या-विमुक्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांच्या निधनाने वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ.गस्ती यांनी उत्थान या संस्थेच्या माध्यमातून देवदासींच्या पूनर्वसनासह बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्रासहकर्नाटक आणिआंध्र प्रदेशातही त्यांच्या संस्थेने केलेले कार्य मोलाचे आहे.उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. गस्ती यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी वाहिले होते.देवदासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. यासोबतच बेरड हे आत्मचरित्र, तसेच आक्रोश, सांजवारा आदी साहित्य कृतींच्या माध्यमातून वंचित-उपेक्षित घटकांचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर मांडले होते. त्यांच्या निधनाने एका तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या सोबतच प्रतिभावंत साहित्यिकही गमावला आहे.