झेंडा लेलो साब झेंडा… झेंडे का दिन है… पाच रूपये में एक… दस रुपये मे एक… लेलो साब लेलो… लेलो मेम सहाब… अपने मुन्ना के लिए लेलो… अचानक… अबे झेंडा सीधे ढंग से तो पकड… ये भारत का प्लॅग है… तेरा कोई सडकछाप खिलौना या गुब्बारा नही… भिकारी साला… हा संवाद कानी येतो अन् आपसुक जाणीव होते राष्ट्रीय सण आल्याची. पुणे, मुंबई सारख्या महानगरातील सिग्नलवरील चौका चौकात हे दृश्य हमखास दिसते…!
पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरांमध्ये स्थलांतरीत झालेला भटका समाज खेळण्यातल्या वस्तू, फुगे विक्री करण्यात दंग असतो. धार्मिक असो वा राष्ट्रीय सण या सणांच्या निमित्ताने बाजारात काय विकलं जातं ते विकून पोटाची आग विझवण्यासाठी लागणारे पैसे मिळाले की, मग बस्स असा दिनक्रम असलेला भटका समाज प्रजाकसत्ताक होण्यासाठी धडपडतो आहे. या धडपडीस समाजातील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यक्ती पाठबळ देत नवनिर्माणाचे बिजे पेरत आहेत. भटक्या समूहाला शिक्षण व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी काम करणार्या अजित फाऊंडेशन (बार्शी) व रोशनी (पुणे) या संस्थांनी एकत्रित येत पुण्यातल्या डेक्कन परिसरातील झेडब्रीज या प्रसिद्ध ब्रीजखाली वास्तव्यास असलेल्या पारधी समाजातील मुलांसाठी ग्रीन सिग्नल स्कूल ही अनौपचारिक शाळा मागील काही महिन्यांपासून सुरू केली आहे. तसेच दारिद्र्याने पिचलेल्या वंचित उपेक्षित घटकातील स्थलांतरित लोकांना किमान अंगभर तरी कपडे असावेत, यासाठी सचिन, आशा, सुभाष या विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी समविचारी महाविद्यालयीन तरुणांना एकत्र करत समाजबंध नावाचा उपक्रम हाती घेतला आहे.
प्रजाकसत्ताकदिन देशभरातील शाळा कॉलेज, शासकीय, निमशासकीय स्तरावर मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. देशभक्तीच्या वातावरणात जनता न्हाऊन निघते. मात्र, असे काही समाज घटक आहेत जे देश प्रजाकसत्ताक होऊन सत्तर वर्षे होत आली तरी अजूनही प्रजाकसत्ताक नाहीत. मग अशा वंचित घटकातील लोकांना, त्यांच्या मुलांना स्वातंत्र्यदिन प्रजाकसत्ताकदिन का साजरे केले जातात? याचा साधा मागसुमही नसतो. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठीच्या हेच लोक झेंडे विक्री करताना दिसतात. हे विरोधाभासाचे चित्र बदलले पाहिजे, याकरिता टीम समाजबंधने ग्रीन सिग्नल स्कूल मधील मुलांसमवेत प्रजाकसत्ताक दिन साजरा करायचे ठरवले.तशी तयारी समाजबंधच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती.
26 जानेवारी… वेळ सकाळची… मुळा नदीपात्रातील झेडब्रीज… नदी किनारी… भटक्यांची पालं… काही झोपलेले…काही उठलेले… काही उघड्यावर अंघोळ करत असलेले…काही अर्ध झोपेतच लोळत असलेले… काही लहान मुलं रडत असलेले… हे दृश्य… समाजबंध व ग्रीन स्कूलची टीम पाहत होती. समाजबंध टीममधील काही कार्यकर्ते राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी आवश्यक तयारी करत होते…… तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी राष्ट्रप्रेम जागवणारी धून वाजवली जात होती. ध्वजवंदनेसाठी लगबगीने शाळेत जाणारी उत्साही शाळकरी मुलं… अंगावरती परिधान केलेला नवाकोरा गणवेश अन् त्यावर भारताचा बॅच, एकच जल्लोष भारत माता की, जय! आनंदोत्सवाचं वातावरण…!
पारधी वस्तीतील ग्रीन सिग्नल शाळेतल्या मुलांना प्रजासत्ताक दिन अनुभवता यावा, आपणही याच देशाचे घटक आहोत… भारत आमचाही देश आहे, हे त्यांना कळावं म्हणून समाबंध टीमने ग्रीन सिग्नल स्कूलवर ध्वजावंदन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू होण्यास काही वेळ असतानाच महाविद्यालयीन तरुणाई अवतरली. तसेच काही मान्यवरही उपस्थित झाले. पण, अचानक माहोल बदलला. पोटाची आग शमवण्यासाठी दुडुदुडु धावणारे पाय परतीकडे आले की, समाजबंध व ग्रीन सिग्नल शाळेने नियोजित कार्यक्रम दुपारसत्रात घेतले. यावेळी सचिन, आशा, सुभाष, मृण्मयी कोळपे, संतोष डिंमळे, शर्मिला ताह्मणकर, स्वाती कांबळे अविनाश भुजबळ, रुता जोशी, सतिश ठाकरे, ओंकार व्हरकट, आकाश शिंदे, अमर बोरसे, स्वप्निल सानप, असिम फाऊंडेशनचे सचिन गायकवाड, जाणीव जागृती फाउंडेशनचे अवधूत बागल या प्रमुख कार्यकर्त्यांनी वंचितांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नदीपात्रात तातडीने कबड्डीचे मैदान तयार करून दिले व सामनाही खेळवला. काही तरुणांनी देशभक्तीपर गीते म्हटली.
खांबावरच्या झेंड्यापेक्षा हातातला झेंडा या पोरांसाठी महत्त्वाचा आहे, कारण हातातला झेंडा दहा रुपये मिळवून देतो.पण, या वंचितांना जोपर्यंत खांबावरचा झेंडा काय काय देऊ शकतो हे समजत नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही, हे तितकंच खरं…!
(लेखक – प्रयोगवन प्रकल्पाचे संस्थापक आहेत.)
-सत्तार शेख