भुसावळ। भिकार्यास भीक देणे ही समाजसेवा पण भिकारीच निर्माण होऊ नये, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्य करणे म्हणजे प्रबोधन. समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी प्रबोधनात्मक कार्याची गरज असल्याचे प्रतिपादन शालेय पोषण आहार अधीक्षक सौमित्र अहिरे यांनी येथे केले. भागीरथी विद्यामंदिरात ‘गणरायास समर्पणाची दुर्वा’ या उपक्रमांतर्गत डॉ. अभय फलटणकर यांच्या सहकार्यातून अंतर्नादतर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विचारमंचावर या मान्यवरांची उपस्थिती
विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, प्रभाकर नेहते, नेव्ही कॅप्टन संदीप रायभोळे, मुख्याध्यापक अजय फेगडे, प्रा.शाम दुसाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समाजसेवेसाठी शहराला चांगल्या लोकांची गरज : उमेश नेमाडे
लहानपणी पाटी पेन्सीलीचा आंनद काही वेगळाच होता असे सांगत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. साहित्य मिळून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. समाजसेवा होण्यासाठी पिढी घडून आली पाहिजे. चांगल्या लोकांची गरज शहरास आहे. शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम लहान पण मर्म मोठा असे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले. मुलांनो, आई वडिलांना सांगा मोबाईल बाजूला ठेऊन माझ्याशी बोल, असा विद्यार्थ्यांशी संवाद साधत नेमाडे यांनी मोबाईल आई वडीलांपासून मुलांना दूर करत आहे याकडे लक्ष वेधले. सूत्रसंचालन उमेश चव्हाण यांनी तर आभार मुख्याध्यापक फेगडे यांनी मानले.
अंतर्नादच्या उपक्रमाचा गौरव
सौमित्र अहिरे यांनी आपल्या उपक्रमात अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आपल्या मनोगतात गौरव केला. अंतर्नाद सारख्या संस्था भुसावळातही सामाजिक कार्याचे भान राखून काम करीत असल्याने शहरवासीयांसाठी ही बाब गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
आई-वडिलांना विसरू नका
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपेक्षित घटकांना मदतीचा हात मिळाल्यास त्यांना प्रवाहात आणण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा, पण आई-वडिलांना कधी विसरु नका. आई-वडीलांच्या कष्टातूनच आपले शिक्षण होत आहे त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज ओळखून मोठे अधिकारी व्हा, राष्ट्राभिमान वाढवा, असेही ते म्हणाले.