प्रेरणा दौर्याद्वारे मेळघाटातील देवदूताला भेटले जळगाव जिल्ह्यातील शिक्षक
भुसावळ- मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये असलेले कुपोषण, अंधश्रद्धा, विविध शारीरिक व मानसिक आजार यासह त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी सोडविण्याचा विडा उचलून तब्बल 33 वर्षांपासून या समस्या निराकरण करण्याचे काम आम्ही करत आहोत. माणसातच आम्ही देव पाहत असल्याने वंचितांची सेवा करण्यामुळे आमचे जीवन धन्य झाले आणि त्यातच आम्हाला सातत्याने आनंद मिळत असल्याचे प्रतिपादन मेळघाटातील देवदूत म्हणून संबोधले जाणारे डॉ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी प्रेरणा दौर्यादरम्यान केले. भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे आयोजित प्रेरणा दौर्याद्वारे जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी अमरावती जिल्ह्यातील बैरागड येथे जाऊन डॉक्टर कोल्हे दाम्पत्याशी खुली चर्चा केली.
प्रेरणा दौर्यात यांचा सहभाग
या दौर्यात गृपप्रमुख डॉ.जगदीश पाटील, प्रकल्प प्रमुख संजय ताडेकर, संपर्कप्रमुख प्रा. दिलीप ललवाणी, भागवत पाटील, दिलीप वैद्य, अनिल महाजन, हेमेंद्र नगरिया, विठोबा पाटील, गजानन नारखेडे, तुळशीराम होले, दंगल पाटील, संजीव पाटील, सुनील वानखेडे, नलिनी वानखेडे, मनिषा ताडेकर, मीरा जंगले, वंदना भिरूड, किसन भिरूड, नितीन छेडा, रिटा छेडा, लीलाबाई पाटील, शोभा ललवाणी, निशा पाटील, गुणवंत हिरे आदींचा सहभाग होता. भुसावळ म्हणून बैैरागड येथे गेल्यानंतर कोल्हे दांपत्यांनी सर्वांचे आदरातिथ्य केले. प्रास्ताविकात गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी प्रेरणा दौरा हा ज्ञानासह मनोरंजन गृपचा 23 वा उपक्रम असल्याचे सांगितले.
भुसावळ तर आपले माहेरघर डॉ.कोल्हे
डॉ.रवींद्र कोल्हे यांचे वडील रेल्वे कर्मचारी असल्याने आणि लहानपणी आजारी पडल्यानंतर भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या दवाखान्यात सातत्याने येत असल्याने भुसावळला त्यांनी आपले माहेरघर संबोधले. तब्बल चार तासांच्या प्रदीर्घ खुल्या चर्चेत बालपणापासून ते आतापर्यंतच्या स्वःचरीत्राचा आढावा कोल्हे दाम्पत्याने घेतला. स्वतः एमडी आणि पत्नी डीएचएमएस असताना दवाखाना न टाकता मेळघाटातील आदिवासी लोकांसाठी काम करण्याचा विडा त्यांनी उचलला. 1985 पासून ते सातत्याने आदिवासी लोकांसाठी झटत असून आपले जीवन त्यांनी वंचितांसाठी समर्पित केले आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्याने फक्त आरोग्यसेवाच न पुरवता त्यांनी आदिवासींच्या समाजजीवनातील अंधश्रद्धा दूर करण्याचाही प्रयत्न केला. तसेच कृषी क्षेत्रातील विविध संशोधनांचा अभ्यास करून जास्तीत जास्त उत्पादित होऊ शकणार्या विविध बियाण्यांचा वापर शेतात करण्याबाबत आदिवासींना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आतापर्यंत शेकडो पुरस्कारांनी गौरवण्यात आले असल्याचेही त्यांनी आपल्या खुल्या चर्चेदरम्यान सांगितले. दरम्यान, उपस्थित शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे कोल्हे दाम्पत्याने मनमोकळेपणाने दिली. सूत्रसंचालन संजय ताडेकर यांनी तर आभार प्रा. दिलीप ललवाणी यांनी मानले.