वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत – प्रकाश आंबेडकर

0

नांदेड : काँग्रेसकडून आघाडीबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत आहे, यामध्ये एमआयएमही सोबत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महासभेसाठी अ‍ॅड. आंबेडकर हे नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी याविषयी माहिती दिली.

काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी एमआयएमला बाजूला करण्याची अट घातली जात असल्यासंदर्भात विचारले असता,  काँग्रेस अनेक ठिकाणी भाजपासोबत सत्तेत विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी उदगीर नगरपालिकेचे उदाहरण दिले. काँग्रेसने भाजपाला सर्वप्रथम सोडावे, नंतर आमच्यावर टीका करावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. बहुजन वंचित आघाडीचा आरएसएसला असलेला हा विरोध सैद्धांतिक आहे, आरएसएस व्यक्तिगत, धर्मस्वातंत्र, लोकशाहीला नकार देते तर मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते. यामुळे आमचा त्यांच्या विचाराशी लढा आहे असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.