वंदेमातरम सक्तीचा कायदा करा – उद्धव ठाकरे

0

मुंबई | देशभक्तीच्या नावाने थोतांड नको तर वंदेमातरम सक्तीचा कायदा करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. ते ‘मार्मिक’च्या 57 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. वंदेमातरम रोज म्हटले गेले पाहिजे, या देशाच राष्ट्रध्वज फडकवणार असाल तर या देशाचे राष्ट्रगीत म्हणावेच लागेल, असेत्यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, की देशभक्ती फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला नको तर ती कायम असली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये तर योगी सरकारने फतवा काढलाय मदरशांत देशभक्तीची परिक्षा घेणार, त्यावर काही म्हणताहेत, झेंडावंदन करू; पण राष्ट्रगीत, वंदेमातरम म्हणणार नाही. राहता त्या देशाचे राष्ट्रगीत म्हणणार नसाल तर झेंडा कुणाचा फडकवणार? असा सवाल उद्धव यांनी केला.

ज्या देशात राहता, त्या मातृभूमीला वंदन करण्यास विरोध कशासाठी? राहता त्या देशाचे राष्ट्रगीत म्हणायला लाज कसली वाटते? महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन आमदारांनी राष्ट्रगीतास विरोध केला. भाजपाचे मंत्री जर वंदेमातरम म्हणण्याची कुणाला सक्ती करता येणार नाही, असे म्हणत असतील तर मग काय करणार? असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
गणेशोत्सव आला की लोकमान्य टिळकांची आठवण येते, असे सांगून उद्धव म्हणाले, पुण्यात लोकमान्यांचा चेहरा गणेशोत्सवात नको म्हणताहेत; हा प्रकार म्हणजे कपाळकरंटेपणा नाही तर दुसरं काय?