मुंबई : वंदे मातरम् म्हणू नका, असे कोणत्या धर्मग्रंथात लिहिले आहे ते दाखवा, असे आव्हान देत या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ठणकावले. मद्रास उच्च न्यायालयाने एक आदेश देत तामिळनाडूतील शाळा-कॉलेज तसेच सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हटले जावे, अशी सक्ती केली आहे. या निर्णयावर सपाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले. मानेवर सुरी ठेवा, देशाबाहेर काढा, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असे आझमी म्हणाले होते. त्यावरून विधानसभेत जोरदार पडसाद उमटले.
वंदे मातरम् इस्लामच्या विरोधात : आ. आझमी
भाजप आमदार अनिल गोटे यांनी ’वंदे मातरम्’चा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या देशात राहणार्यांना वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे गोटे म्हणाले. त्यावर आझमी यांनी आक्षेप घेतला. ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा’, ’हिंदुस्थान झिंदाबाद’ असा जयघोष आम्ही हजारवेळा करू मात्र वंदे मातरम् म्हणणार नाही. वंदे मातरम् इस्लामच्या विरोधात आहे, असे आझमी म्हणाले. देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांचे अनेक सरदार मुस्लीम होते. त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत, असे पसरवू नका, असेही आझमी म्हणाले. त्यावर खडसे यांनी आक्रमक होत ’इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा’, असे हिंदीतच ठणकावले. वंदे मातरम् गातच स्वातंत्र्यलढा लढला गेला आहे. मग त्यावर आक्षेप कशासाठी? या मातीत तुमचा जन्म झाला आहे. येथेच तुम्ही लहानाचे मोठे झाला आहात. येथेच तुम्ही घडला आहात आणि मृत्यूनंतर येथेच तुमच्यावर अंत्यसंस्कार होणार असतील तर या मातीला वंदन करण्यात काय अडचण आहे?, असा सवाल खडसे यांनी केला.
काय झाले विधानसभेत….
वंदे मातरम् म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी काल केले होते. त्यानंतर शुक्रवारी विधानसभेत ‘वंदे मातरम’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून आझमींवर जोरदार हल्लाबोल केला.
देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे. तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर याच जमिनीत पुरावे लागते : खडसे
मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलचं पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे? खडसेंच्या सवालाने आझमी झाले निरुत्तर!